अकरावी प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे पहिली गुणवत्ता यादी पुन्हा पुढे ढकलण्यात आली, त्यामुळे पालक आई विद्यार्थी यांचा बराच गोंधळ उडलेला दिसत आहे. शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवसापासून घातलेल्या गोधळानंतर पहिली यादीही पुढे ढकलण्यात आली.
सतत होणार्या या अडचणी आणि तांत्रिक बिघाड मुळे, पालक व विद्यार्थी संतप्त झाले आहेत. अकरावीचे प्रवेश विलंबाने झाल्याने विद्यार्थ्यांचे होणार नुकसान कसे भरून काढणार, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. तर प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळावे यासाठी यंदा राज्य मंडळाने दहावी परीक्षा १५ दिवस आधी घेतली आणि निकाल १३ मे रोजी जाहीर केला. निकाल जाहीर करण्यासाठी शिक्षण विभागाने शिक्षकांवर दबाव टाकून उत्तरपत्रिका लवकर तपासून घेतल्या. त्यानंतर २१ मेपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला.
मात्र सातत्याने येत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थी व पालक हतबल झाले होते. तांत्रिक अडचणींचा सामना करत अखेर ७ जून रोजी ऑनलाईन अर्ज नोंदणी पूर्ण झाली. परंतु तांत्रिक अडचणीचे शुक्लकाष्ठ कायम राहिल्याने १० जून रोजी जाहीर होणारी पहिली गुणत्तवा यादी २६ जून रोजी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना २६ जूनपासून सुरू होणारी प्रवेश प्रक्रिया सुरळीत चालेल अशी अपेक्षा होती.
मात्र यंदा प्रथमच राज्यभरात केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक समस्येला सामोरे जावे लागले. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया नोंदणी पुढे ढकलण्यात आली. नोंदणी प्रक्रिया २६ जूनपासून सुरू करण्यात आली.