Pune Yerawada – Katraj Tunnel Project : ७५०० कोटींचा खर्च अपेक्षित
पुणेकरांच्या गतीमान प्रवासासाठी आता मोठा पाऊल उचलण्यात येत आहे. पुण्यातील येरवडा ते कात्रज दरम्यान भुयारी मार्ग (Tunnel Project) करण्याच्या प्रस्तावाला गती मिळाली असून, सहा लेनच्या दोन भुयारी मार्गांसाठी तब्बल ७५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
प्रकल्पाचा निर्णय पुढील दीड महिन्यात
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) या प्रकल्पाचे भवितव्य ठरविण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी ‘मोनार्क’ नावाची एजन्सी नेमण्यात आली असून, ती या प्रकल्पाचा वैज्ञानिक अभ्यास करत आहे. पुढील दीड महिन्यात हा अभ्यास अहवाल सादर होणार असून, त्यानंतर प्रकल्पाची अंतिम मान्यता दिली जाईल.
भुयारी मार्गाची उपयुक्तता तपासली जाणार
या प्रकल्पात नेमके किती वाहने रोज प्रवास करतात, वाहतूक कोंडीची स्थिती कशी आहे, तसेच भुयारी मार्ग झाल्यानंतर रस्त्यावरील किती ट्रॅफिक कमी होईल, याचा सविस्तर अभ्यास केला जाणार आहे. तीन महिन्यांच्या या सर्वेक्षणातून मिळालेल्या आकडेवारीवरून सरकार अंतिम निर्णय घेणार आहे.
मुख्यमंत्र्यांची मान्यता आणि पीएमआरडीएची भूमिका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता दिली आहे. पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांनीही या प्रकल्पाला महत्त्व दिले असून, रिंगरोड आणि महामार्ग जोडणीसारख्या इतर पायाभूत प्रकल्पांबरोबरच हा प्रकल्प पुण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगितले आहे.
येरवडा – कात्रज भुयारी मार्ग प्रकल्प राबविल्यास पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारक बदल होऊ शकतात. हा प्रकल्प प्रत्यक्षात येईल का, हे येत्या दीड महिन्यातील अभ्यास अहवालावर अवलंबून आहे. दरम्यान, पुणेकर मात्र या प्रकल्पाबाबत मोठ्या अपेक्षेने वाट पाहत आहेत.