सुहाना खान वादात सापडली! जमीन व्यवहार प्रकरणी शासनाची फसवणूक केल्याचा आरोप!

अलिबाग | 14 सप्टेंबर 2025: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी व अभिनेत्री सुहाना खान हिच्या अलिबागमधील जमीन खरेदी प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप होत असून, तहसिलदार कार्यालयाच्या दोन स्वतंत्र अहवालांमुळे या वादाला नवा ट्विस्ट मिळाला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

अलिबाग तालुक्यातील थळ गावातील गट क्रमांक 345/2 मधील अंदाजे दीड एकर जमीन मूळ मालक अंजली खोटे यांच्या नावावर होती. ही जमीन वर्ग-२ प्रकारातील असल्याने ती थेट विक्री करता येत नाही. मात्र, परवानगी मिळण्याआधीच अंजली खोटे यांनी 31 मे 2023 रोजी सुहाना खानसोबत 12.91 कोटी रुपयांत नोंदणीकृत साठेकरार केला. यामुळे शासनाला अंधारात ठेवून व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तहसिलदार अहवालातील निष्कर्ष

तहसिलदार विक्रम पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार, या जमिनीवर मागील 35 वर्षांपूर्वी बांधलेले घर, वॉचमन रूम, बाथरूम आणि स्विमिंग पूल आहे. म्हणजे मूळ शेतीसाठी देण्यात आलेल्या जमिनीवर बांधकाम झाले आहे. यामुळे जमीन नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होते.

तसेच अहवालात अर्जदारांनी जमीन वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्यासाठी बाजारमूल्याच्या 50 टक्के रक्कम दंड म्हणून भरण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, तक्रारदार अ‍ॅड. ठाकूर यांनी शासनाची फसवणूक झाल्याने जमीन सरकार जमा करावी आणि संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

वादग्रस्त स्थिती कायम

सध्या जमिनीची मालकी अंजली खोटे यांच्या नावावरच असून, सुहाना खानकडे थेट मालकी हस्तांतरित झालेली नाही. मात्र, प्रत्यक्ष ताबा सुहाना खानकडे आहे का, याबाबत अहवालात स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे या प्रकरणी महसूल विभाग पुढे काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणामुळे सुहाना खानच्या अडचणीत भर पडली आहे. शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप, जमीन नियमांचे उल्लंघन आणि साठेकरारातील विसंगतीमुळे या वादग्रस्त व्यवहारावरून पुढील काळात कायदेशीर पावले उचलली जातात का, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top