व्हिसा संकटाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या दिग्गज कंपन्यांचा मोठा निर्णय – दोन भारतीय वंशीय सीईओ पदावर!
अमेरिकेतील एच-१ बी व्हिसा नियमांमध्ये ट्रम्प प्रशासनाने कठोरता आणल्यानं हजारो भारतीय व्यावसायिक अडचणीत आले आहेत. मात्र या पार्श्वभूमीवर दोन दिग्गज अमेरिकन कंपन्यांनी भारतीय वंशाच्या व्यक्तींना सर्वोच्च पदावर नियुक्त करून ठोस संदेश दिला आहे. उत्तम कामगिरी करणाऱ्यांना संधी देण्यात अमेरिकन कंपन्या कोणताही दबाव सहन करणार नाहीत, असा अप्रत्यक्ष इशारा कंपन्यांनी ट्रम्प प्रशासनाला दिल्याचे मानले जात आहे.
टी-मोबाईलचे नवे सीईओ – श्रीनिवास गोपालन
५५ वर्षीय श्रीनिवास गोपालन यांची अमेरिकेतील दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी टी-मोबाईलचे नवे सीईओ म्हणून निवड झाली आहे. १ नोव्हेंबरपासून ते या पदाचा कार्यभार स्वीकारतील. गोपालन हे आयआयएम अहमदाबादचे माजी विद्यार्थी असून, सध्या ते कंपनीत सीओओ म्हणून काम करत आहेत.
सध्याचे सीईओ माईक सीवर्ट यांनी २०२० पासून कंपनीचे नेतृत्व केले असून, आता ते उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळतील. या संधीबद्दल बोलताना गोपालन यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये लिहिले – “टी-मोबाईलमध्ये सीईओ पदाची जबाबदारी मिळणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. अनेक वर्षांच्या कामगिरीचे हे फलित आहे.”
मोल्सन कूर्सचे नवे नेतृत्व – राहुल गोयल
दुसरीकडे, शिकागोस्थित पेय कंपनी मोल्सन कूर्स मध्ये ४९ वर्षीय राहुल गोयल यांची सीईओ म्हणून नियुक्ती झाली आहे. १ ऑक्टोबरपासून ते पदभार स्वीकारतील. गोयल गेल्या २४ वर्षांपासून कंपनीत कार्यरत असून, त्यांचा जन्म भारतात झाला आहे.
गोयल यांनी म्हैसूरमधून अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली आणि नंतर डेनवरमध्ये व्यवसाय शिक्षण घेतले. अमेरिका, ब्रिटन आणि भारतात त्यांनी मोल्सन आणि कूर्स ब्रँडसाठी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
भारतीयांची वाढती छाप
या दोन नियुक्त्यांमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले की भारतीय वंशाच्या व्यावसायिकांची क्षमता जागतिक पातळीवर मान्य केली जाते. अमेरिकन कंपन्यांनी दिलेला हा निर्णय ट्रम्प प्रशासनाच्या कठोर व्हिसा धोरणाला उत्तर असल्याचेही मानले जात आहे.
व्हिसा संकट आणि राजकीय दबाव याच्या पार्श्वभूमीवर दोन भारतीयांना अमेरिकेतील आघाडीच्या कंपन्यांचे सीईओ पद मिळणे ही मोठी अभिमानास्पद बाब आहे. हा निर्णय केवळ भारतीयांसाठी प्रेरणादायी नाही, तर जागतिक बाजारपेठेत भारतीयांची वाढती ताकदही दाखवून देतो.