देशातील सर्वात तरुण अब्जाधीश अरविंद श्रीनिवास! जाणून घ्या संपत्ती किती आहे?

देशातील सर्वात तरुण अब्जाधीश अरविंद श्रीनिवास – M3M हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 मध्ये चमकलेले नाव. M3M हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 जाहीर झाली असून, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी समोर आली आहे. या यादीत नेहमीप्रमाणे मुकेश अंबानी पहिल्या स्थानावर आहेत, तर दुसरा क्रमांक गौतम अदानी यांनी पटकावला आहे. या वर्षी अनेक नवीन नावं देखील यादीत झळकली आहेत. खास म्हणजे अभिनेता शाहरुख खान पहिल्यांदाच अब्जाधीशांच्या या यादीत समाविष्ट झाला आहे.

परंतु, सर्वात मोठं लक्ष वेधून घेतलं आहे ते अरविंद श्रीनिवास यांनी. फक्त ३१ वर्षांच्या वयात ते देशातील सर्वात तरुण अब्जाधीश ठरले आहेत.

अरविंद श्रीनिवास कोण आहेत?

अरविंद श्रीनिवास यांचा जन्म ७ जून १९९४ रोजी चेन्नईत झाला. त्यांनी आयआयटी मद्रास येथून बीटेक आणि एमटेक पूर्ण केलं. त्यानंतर ते कॅलिफॉर्निया विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी करण्यासाठी गेले. या दरम्यान त्यांनी OpenAI आणि Google Brain मध्ये रिसर्च इंटर्न म्हणून काम केलं.

२०२२ मध्ये अरविंद यांनी Perplexity AI या स्टार्टअपची स्थापना केली आणि केवळ काही वर्षांत ते मोठं यशस्वी ठरले.

Perplexity AI काय आहे?

Perplexity AI हे एक AI-पॉवर्ड सर्च इंजिन आहे. हे प्लॅटफॉर्म गुगल आणि चॅटजीपीटीसारख्या कंपन्यांना टक्कर देत आहे. जुलै २०२५ पर्यंत या कंपनीचं बाजारमूल्य तब्बल १.१५ लाख कोटी रुपये इतकं झालं. कंपनीला ऍमेझॉन, एनव्हिडीया आणि सॉफ्टबँक यांच्याकडून गुंतवणूक मिळाली आहे.

सध्या Perplexity AI चे मुख्यालय कॅलिफॉर्निया येथे असून, ही कंपनी तुफान वेगाने प्रगती करत आहे.

संपत्ती किती आहे?

M3M हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार, अरविंद श्रीनिवास यांची एकूण संपत्ती २१,१९० कोटी रुपये इतकी आहे. ते देशातील सर्वात तरुण अब्जाधीश ठरले आहेत.

याचबरोबर त्यांनी फेसबुकचे माजी एआय शास्त्रज्ञ डेनिस याराट्स आणि डेटाब्रिक्सचे सहसंस्थापक अँडी कोनविस्की यांच्यासह ही कंपनी स्थापन केली होती. तसेच २०२३ मध्ये अरविंद यांनी एंजल इन्वेस्टर म्हणूनही गुंतवणूक केली होती. त्यांच्या पोर्टफोलियोमध्ये ElevenLabs सारख्या एआय कंपन्या आहेत.

तरुण अब्जाधीशांचा ट्रेंड

अरविंद श्रीनिवास यांच्यासह झेप्टोचे सहसंस्थापक कैवल्य वोहरा (२२ वर्षे) आणि आदित पालीचा (२३ वर्षे) यांचाही समावेश या यादीत झाला आहे. यावरून भारतातील तरुण उद्योजक वेगाने उंच भरारी घेत असल्याचं दिसून येतं.

M3M हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 मध्ये फक्त पारंपरिक उद्योगच नाहीत, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि स्टार्टअप क्षेत्रातील तरुण उद्योजक देखील झळकू लागले आहेत. अरविंद श्रीनिवास हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top