पुण्यात विद्यार्थी संघटनांमध्ये राडा! मनसे विद्यार्थी सेना विरुद्ध अभाविप आमने-सामने!

पुणे :विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात विद्यार्थी संघटनांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मनसे विद्यार्थी सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्यात वाद निर्माण होऊन राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुण्यातील वाडिया कॉलेज परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये “बॉयकॉट मनसे विद्यार्थी सेना” अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले. या पोस्टरवर ABVP लिहिल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे मनसे विद्यार्थी सेना आक्रमक झाली. संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तरादाखल अभाविपच्या कार्यालयाला कुलूप लावले. या कृतीनंतर अभाविपचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.
घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेचा पार्श्वभूमी

विशेष म्हणजे, वाडिया कॉलेजमध्ये त्याच दिवशी मनसे विद्यार्थी सेनेच्या शाखेचं उद्घाटन होणार होतं. त्याआधीच कॉलेज परिसरात “बॉयकॉट मनसे विद्यार्थी सेना” अशी पोस्टरबाजी झाली. त्यामुळे दोन्ही संघटनांमध्ये वाद निर्माण झाला. मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी ही पोस्टरबाजी अभाविपने केली असल्याचा आरोप केला आहे. मात्र अभाविपकडून या आरोपाचे खंडन करण्यात आले असून त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अभाविप कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया

अभाविपच्या एका कार्यकर्त्याने सांगितलं —

“ही आमची प्रॉपर्टी आहे. कुणीही येऊन कुलूप लावू दे, आम्ही ते कुलूप तोडू. आमचं नीट बोलणं झालं होतं, पण पोलिस आम्हाला वर जाऊ देत नाहीत,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

तर दुसऱ्या एका कार्यकर्त्याने म्हटलं —

“मनसेच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यालयाला कुलूप लावलं, पण आमचा त्यात काहीही संबंध नाही. आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.”

पोलीस तपासात गुंतले

ही घटना पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचली असून, दोन्ही विद्यार्थी संघटनांमधील वाद टाळण्यासाठी पोलीस दल सतर्क झाले आहेत. वाडिया कॉलेज परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे.

पुण्यासारख्या शिक्षणनगरीत विद्यार्थी संघटनांमधील वादामुळे वातावरण तापले आहे. शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या संघटनांमध्ये असा संघर्ष होणं दुर्दैवी आहे. आता पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top