फलटण प्रकरणावर बच्चू कडूनी सरकारला धरलं धारेवर! देवेंद्र फडणवीस यांना ‘राजीनामा’ ची मागणी!

फलटण प्रकरणावर बच्चू कडूंचा संताप – “फडणवीसांनी माफी तरी मागावी”

फलटणमध्ये घडलेल्या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर अभाज्य वंचित आघाडीचे नेते बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हटलं की, “फलटण प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांनी राजीनामा नाही तर कमीत कमी माफी तरी मागावी.”

बच्चू कडू म्हणाले, “शेतकऱ्याचं आयुष्यच काळं आहे. दिवाळी आली तरी त्याचं आयुष्य उजळत नाही. सरकार दोन लाखांचे फटाके फोडतं, पण शेतकऱ्यांना पाच हजारात बुडवतं.” त्यांनी पुढे सांगितले की, शेतकऱ्यांची सरकारकडे काही किंमत नाही. धर्म आणि जातीच्या राजकारणात शेतकऱ्यांचा आवाज दबवला गेला आहे.

देशात सर्वात लबाड बोलणारा मुख्यमंत्री कोण? – बच्चू कडूंची टीका

दुष्काळाच्या काळात “कर्जमाफी देऊ” म्हणणारे फडणवीस आता “मार्चपर्यंत वेळ आहे” असं म्हणतात, अशी टीका बच्चू कडू यांनी केली. त्यांनी म्हटलं, “देशात सर्वात लबाड बोलणारा मुख्यमंत्री कोण असेल तर तो फडणवीस आहे. सरकारचं काम आता बनवाबनवीवर चाललं आहे.”

सोयाबीन केंद्र सुरू नाही, मग माल कुठे टाकायचा?

शेतकऱ्यांच्या अडचणींबद्दल बोलताना बच्चू कडू म्हणाले, “सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करत नाहीत आणि व्यापाऱ्यांना सांगतात की हमीभावापेक्षा कमी दराने माल विकू नका. मग उरलेला माल कुठे टाकायचा? भाजपच्या कार्यालयात का?” त्यांनी सरकारच्या दुहेरी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

तेलंगणा सरकार शेतकऱ्यांना मदत करते, मग महाराष्ट्र का नाही?

तेलंगणा सरकार प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी पाच हजार रुपये देते, मग महाराष्ट्र सरकार ते का करू शकत नाही, असा सवाल बच्चू कडूंनी केला. त्यांनी सांगितले की, “तुम्ही शहराकडे जसं लक्ष देता, तसंच 25 टक्के लक्ष ग्रामीण भागाकडे दिलं असतं तर आज शेतकरी अशा संकटात सापडला नसता.”

सुरजागड प्रकल्पातही संशय– सरकारवर गंभीर आरोप

बच्चू कडूंनी सुरजागड प्रकल्पावरील भ्रष्टाचारावरही निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, “सुरजागड कंपनीचा शेअर तीन वर्षांत 6 रुपयांवरून 1500 रुपये झाला. यात कोणाची मिलीभगत आहे?” त्यांनी थेट सरकारवर “जाऊ तिथे खाऊ” अशी परिस्थिती निर्माण केल्याचा आरोप केला।

बच्चू कडू म्हणाले, “गृह खाते मुख्यमंत्र्यांकडे असताना फलटण आणि नागपूरसारख्या घटना घडतात. मग नियंत्रण कुठं आहे? हा गृहमंत्री जनतेचा नसून भाजप कार्यकर्त्यांचा आहे.”

बच्चू कडूंनी शेवटी सांगितले, “कर्जमुक्ती आणि हमीभाव जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत आम्ही निवडणुकीचा विचार करणार नाही.”

बच्चू कडूंच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांनी सरकारच्या धोरणांवर थेट हल्लाबोल करत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पुन्हा लक्ष केंद्रीत करण्याची मागणी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top