दौंड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का, माजी उपनगराध्यक्ष वसीम शेख कुल–कटारिया गटात सामील
दौंड : दौंड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय घडामोडींना मोठे वेग आले आहेत. सर्वच पक्ष आपले पॅनल अधिक शक्तिशाली करण्यासाठी कटिबद्ध आहेत. अशात नागरिक हित संरक्षण मंडळ (आरपीआय, पीआरपी आघाडी) गटाला आमदार राहुल कुल आणि माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या नेतृत्वाखाली मोठा बळकटीचा हात मिळाला आहे.
यावेळी या आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा धक्का देणारी हालचाल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष वसीम शेख यांनी कुल–कटारिया पॅनलमध्ये प्रवेश करून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. या प्रक्रियेमध्ये बादशहा शेख यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे समजते.
शहरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात वसीम शेख यांनी अधिकृतरीत्या नागरिक हित संरक्षण मंडळ – विकास आघाडीत प्रवेश केला. या कार्यक्रमास आमदार राहुल कुल, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, बादशहा शेख, योगेश कटारिया, माजी नगरसेवक इस्माईल शेख, राजेश गायकवाड आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश जगदाळे उपस्थित होते.
वसीम शेख यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. नगरपालिका निवडणुकीत या घडामोडींचा थेट परिणाम होणार असून शहरात वेगळाच निकाल लागण्याचे संकेत आता स्पष्ट दिसत आहेत. यामुळे दौंडमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.