दौंड (पुणे) – पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांपैकी एक असलेल्या दौंड नगरपरिषद निवडणुकीत आता चुरस वाढू लागली आहे. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) यांनी आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला असून, दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे आज सोमवार, १७ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
पक्षातील अनेक कार्यकर्ते, नगरसेवक तसेच स्थानिक नेत्यांनी माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे यांच्या कन्या आणि विरधवल जगदाळे यांच्या पुतणी दुर्गादेवी जगदाळे यांना संधी द्यावी अशी जोरदार मागणी केली होती. अखेर या मागणीला प्रतिसाद देत पक्षश्रेष्ठींनी त्यांचे नाव निश्चित केले.
नगराध्यक्ष पद हे ओबीसी आरक्षण प्रवर्गासाठी राखीव असल्याने, दुर्गादेवी जगदाळे या आपल्या कुणबी जात प्रमाणपत्राच्या आधारे अर्ज दाखल करणार आहेत. याबाबतची माहिती दौंड राष्ट्रवादी शहराध्यक्ष गुरमुख नारंग यांनी दिली.
दरम्यान, दौंड शहरात राजकीय वातावरणात चांगलाच वेग आलेला असून महत्त्वाचे गट – कुल-कटारिया गट – यांनी अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे राजकीय समीकरणांमध्ये अनिश्चितता कायम आहे.
आमदार राहुल कुल आणि नेते प्रेमसुख कटारिया यांनी आखली रणनीती-
दौंडचे आमदार राहुल कुल आणि नेते प्रेमसुख कटारिया यांनी या निवडणुकीसाठी मोठी रणनीती आखली आहे. शहरातील राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते तसेच प्रभावी चेहरे – बादशहा शेख, वसीम शेख, इस्माईल शेख आणि नगरसेवक राजेश गायकवाड – यांची कुल-कटारिया गटाला मिळालेली साथ निवडणुकीला अधिकच रंगत आणत आहे.
याउलट, राष्ट्रवादी (अजितदादा गट) देखील ही निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावत आहे. माजी आमदार रमेश थोरात, विरधवल जगदाळे, गुरमुख नारंग, नंदू पवार आणि स्वप्निल शहा यांच्या नेतृत्वाखालील समितीने शहरात प्रचाराला गती दिली आहे. उच्चशिक्षित आणि नव्या पिढीतील नेतृत्व म्हणून दुर्गादेवी जगदाळे यांना पुढे आणण्यात आले आहे.
दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारीसाठी गर्दी वाढल्याने अंतर्गत मतभेद प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. त्यामुळे ही निवडणूक महायुती, महाआघाडी की स्वबळावर – यापैकी कोणत्या पद्धतीने लढवली जाणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.
दौंडच्या राजकारणातील ही नवीन घडामोड आगामी निवडणुकीत मोठे चित्र बदलू शकते.