लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात नगरपरिषद निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असून, सर्व पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते प्रचारात गुंतलेले दिसत आहेत. उद्या होणाऱ्या मतदानाची उत्सुकता वाढत असतानाच, तीन प्रभागांमधील निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने नागरिकांचे लक्ष त्याकडे वेधले गेले आहे. प्रभाग क्रमांक ८ अ, १५ ब आणि १६ ब येथील उमेदवारांनी न्यायालयात अपील दाखल केल्यामुळे या तीन जागांसाठीचे मतदान स्थगित करण्यात आले आहे.
उदगीर नगर परिषदेचे राजकीय महत्त्व मोठे असल्याने आणि माजी मंत्री संजय बनसोडे यांची प्रतिष्ठा दावणीला लागल्याने, यंदाची निवडणूक विशेष चर्चेत आहे. नगराध्यक्षपद हे ‘मिनी आमदारकी’ म्हणून ओळखले जाते. यावेळी हे पद साधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असल्याने स्पर्धा अधिक चुरशीची झाली आहे. भाजपा, काँग्रेस आणि शिंदेसेना या तिन्ही पक्षांकडून उच्च शिक्षित महिला उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकीला रंगत आली आहे.
शहरात भाजप–राष्ट्रवादी युतीमुळे राजकीय समीकरणांना वेग आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच काँग्रेसचे अमित देशमुख यांनी प्रचारसभेद्वारे आपापल्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. यामुळे शहरातील वातावरण आणखी तापले आहे.
या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सात महिला उमेदवार असल्या तरी मुख्य लढत भाजपाच्या स्वाती सचिन हुडे, काँग्रेसच्या खादरी अंजुम फातेमा सय्यद, आणि शिंदेसेनेच्या सुनीता अनिल पंचाक्षरी यांच्यात आहे.
दरम्यान, तीन प्रभागांतील निवडणूक पुढे ढकलली असली तरी प्रभाग क्रमांक ८ ब, १५ अ आणि १६ अ मधील सदस्यपदांसाठीचे मतदान ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहे. त्यामुळे या भागातील मतदार उद्या मतदानासाठी सज्ज आहेत.
उद्या होणाऱ्या मतदानातून कोणते राजकीय समीकरण बदलतील, कोणाचा पक्ष बळकट होईल आणि नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत कोण आघाडी घेईल, याची उत्सुकता नागरिकांमध्ये शिगेला पोहोचली आहे.