पर्यटननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीवर्धन (जिल्हा रायगड) येथे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. बाहेरून आलेल्या पर्यटकांच्या बेदरकार वाहनचालकामुळे एका निष्पाप तरुणाचा जीव गेला असून, या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, पुण्याहून फिरण्यासाठी आलेल्या काही पर्यटकांची काळ्या रंगाची थार जीप श्रीवर्धन शहरात भरधाव वेगाने धावत होती. वाहन चालकाने चुकीच्या बाजूने गाडी चालवत दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. हा अपघात शहरातील बाजारपेठ आणि समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर घडला.
या अपघातात परवेज हमदुले या स्थानिक तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना थार जीपने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की परवेज हमदुले सुमारे ४० फूट अंतरावर फरफटले गेले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली. अपघाताची माहिती मिळताच श्रीवर्धन पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणत पोलिसांनी थारमधील सर्व चार पर्यटकांना ताब्यात घेतले.
प्राथमिक तपासात संबंधित पर्यटक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. थार चालकाविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. अपघातग्रस्त तरुणाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला.
रुग्णालय परिसरातही नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. संतप्त नागरिकांनी काही काळ रस्ते रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत परिस्थिती हाताळली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी श्रीवर्धन शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या घटनेमुळे पर्यटनासाठी येणाऱ्या मद्यधुंद आणि बेफिकीर वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मद्यपान करून वाहन चालवणे, वेगमर्यादा ओलांडणे आणि चुकीच्या बाजूने गाडी चालवणे यामुळे स्थानिक नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.
पर्यटननगरीतील वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कडक नियम, तपासणी नाके आणि कठोर दंडात्मक कारवाई लागू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.