पुणे महापालिका निवडणूक 2026 : पेठेत ‘धंगेकर विरुद्ध आंदेकर’ रंगली हाय-व्होल्टेज लढत
पुणे महापालिका निवडणूक 2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेली आणि लक्षवेधी ठरलेली लढत म्हणजे धंगेकर विरुद्ध आंदेकर. पुण्यातील पारंपरिक पेठ भागात ही निवडणूक केवळ राजकीय नव्हे, तर सत्तेच्या वर्चस्वाची चाचणी मानली जात होती. अखेर या लढतीत आंदेकर कुटुंबाने बाजी मारत धंगेकरांना मोठा धक्का दिला आहे.
जेलमधून निवडणूक आणि थेट विजय – सोनाली आंदेकरांचा धक्कादायक कमबॅक
प्रभाग क्रमांक 23 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली आंदेकर यांनी तुरुंगात असतानाच निवडणूक लढवली आणि शेवटच्या फेरीत आघाडी घेत विजय निश्चित केला. सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या सोनाली आंदेकरांनी शेवटच्या टप्प्यात जोरदार कमबॅक करत धंगेकर कुटुंबाला चकित केलं.
सोनाली आंदेकर यांना एकूण 13,807 मते मिळाली, तर त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या प्रतिभा धंगेकर यांना 10,579 मते मिळाली. ही लढत अटीतटीची असली तरी निकाल स्पष्टपणे आंदेकरांच्या बाजूने गेला.
लक्ष्मी आंदेकर यांचाही विजय – आंदेकर कुटुंबाचं दुहेरी यश
फक्त सूनच नव्हे तर बंडू आंदेकर यांची पत्नी लक्ष्मी आंदेकर यांनीही प्रभाग क मधून विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या ऋतूजा गडाळे यांना अत्यंत कमी फरकाने पराभूत केलं.
या विजयामुळे पुण्याच्या पेठ भागात आंदेकर कुटुंबाने पुन्हा एकदा आपलं राजकीय वर्चस्व सिद्ध केलं आहे.
प्रभाग क – मतांची आकडेवारी
लक्ष्मी आंदेकर (राष्ट्रवादी) – 12,633
ऋतूजा गडाळे (भाजप) – 12,493
डॉ. वैष्णवी किराड (शिंदे गट) – 6,581
निलम करपे (काँग्रेस) – 6,346
कल्याणी कोमकर – 282
NOTA – 1,103
विजयी उमेदवार : लक्ष्मी आंदेकर (राष्ट्रवादी)
प्रभाग ब – मतांची आकडेवारी
सोनाली आंदेकर (राष्ट्रवादी) – 13,807
प्रतिभा धंगेकर (शिंदे गट) – 10,579
अनुराधा मंचे (भाजप) – 10,289
निकीता मारटकर (शिवसेना उबाठा) – 4,529
विजया कद्रे (आप) – 680
NOTA – 1,022
विजयी उमेदवार : सोनाली आंदेकर (राष्ट्रवादी)
मतमोजणी केंद्रात घोषणाबाजी, ‘आंदेकर’ नावाचा प्रभाव
निकाल जाहीर होताच मतमोजणी केंद्रात आंदेकर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अर्ज भरण्याच्या वेळी बंडू आंदेकर यांनी दिलेली “नाव नाही, काम बघा – आंदेकर” ही घोषणा प्रत्यक्षात उतरल्याचं या निकालातून स्पष्ट झालं आहे.
पेठेत ‘नो धंगेकर, ओन्ली आंदेकर’ पॅटर्न?
या निकालानंतर पुण्यातील राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे – “पेठेत आता धंगेकर नाही, फक्त आंदेकर?”
जेलमधून निवडणूक लढवूनही विजय मिळवणं, कमी फरकाने का होईना पण सत्ता टिकवणं, आणि दोन प्रभागांमध्ये यश मिळवणं, हे आंदेकर कुटुंबासाठी मोठं यश मानलं जात आहे.