अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने नेतृत्वाचा निर्णय घेतला असून, विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात येणार आहे. आज सायंकाळी पाच वाजता त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणणाऱ्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अखेर नेतृत्वाबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या बुधवारी सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधनानंतर राज्याच्या राजकारणात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर शुक्रवारी आणि शनिवारी राजकीय घडामोडींना वेग आला.
अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पद कोणाकडे जाणार, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी या चर्चेला पूर्णविराम दिला. पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यानंतर त्या आज सायंकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
पक्षातील वरिष्ठ नेत्यांची एकमुखी भूमिका
या निर्णयाआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर उपमुख्यमंत्रिपदाबाबत स्पष्टता येऊ लागली. पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी पुढे यावे, अशी इच्छा पक्षातील बहुतांश नेत्यांनी व्यक्त केली.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “सुनेत्रा पवार यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. विधिमंडळ गटनेतेपदासाठी त्यांची निवड करण्यात येईल आणि त्यानंतर त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.”
बारामतीत महत्त्वाची बैठक
या निर्णयापूर्वी बारामती येथे सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यात सविस्तर चर्चा झाली. कुटुंबीयांशी आणि पक्षातील नेत्यांशी सल्लामसलत केल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी विधिमंडळ गटनेतेपद स्वीकारण्यास होकार दिला. या बैठकीनंतर पक्षात एकमताचे वातावरण असल्याचे स्पष्ट झाले.
शनिवारी दुपारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईबाहेरील आमदारांना पक्ष कार्यालयाकडून सूचना पाठवण्यात आल्या असून, स्वतः प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही आमदारांशी संपर्क साधला आहे.
उपमुख्यमंत्री पदासाठी सर्वांचा पाठिंबा
मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “सुनेत्रा पवार यांनी पक्ष सांभाळावा, ही सर्वांचीच इच्छा आहे. उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारीही त्यांनी घ्यावी, यावर कोणाचाही आक्षेप नाही.
”दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. “पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस जो निर्णय घेईल, तो सरकारला मान्य असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत अद्याप निर्णय नाही
विधिमंडळ गटनेतेपद आणि उपमुख्यमंत्री पदाबाबत निर्णय झाला असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, सुनेत्रा पवार यांच्याकडेच पक्षाचे अध्यक्षपद सोपवावे, अशी मागणी पक्षातील काही नेत्यांकडून होत आहे.
विमान अपघाताची CID चौकशी
अजित पवार यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या विमान अपघाताची चौकशी आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (CID) करण्यात येणार आहे. एअरक्राफ्ट एक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरो (AAIB) कडून प्राथमिक तपास सुरू असून, त्याच्या निष्कर्षांवर CID सखोल तपास करणार आहे.