केडगाव (ता.दौंड) येथे हुतात्मा एक्सप्रेस समोर येत एका ३९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ९:२५ वाजता घडली आहे.
केडगाव रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी (दि. १४ जुलै) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. हुतात्मा एक्सप्रेस रेल्वेसमोर उडी मारून एका ३९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे. सकाळी ९:२५ वाजता, अमोल निंबाळकर हुतात्मा एक्सप्रेसच्या समोर रेल्वे ट्रॅकवर उभा राहिला आणि त्याने थेट रेल्वेखाली येऊन आपले प्राण गमावले. घटनेच्या क्षणाने तेथे उपस्थित प्रवाशांसह स्थानकावरील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.
याबाबत दौंड रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीचे नाव अमोल अशोक निंबाळकर (वय ३९ वर्षे) असे असून तो आंबळे (ता.शिरूर) येथील रहिवासी असल्याबाबत अधिक माहिती मिळत आहे. अमोल याने रेल्वेसमोर येउन आत्महत्या का केली याबाबत मात्र माहिती मिळू शकले नाही.
सदर व्यक्ती थेट रेल्वेसमोर आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याने आत्महत्या का केली याबाबत दौंडचे रेल्वे पोलिस हवालदार टिंगरे हे अधिक तपास करीत आहेत. त्यामागे कोणते वैयक्तिक, कौटुंबिक किंवा आर्थिक कारण होते का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून यासंदर्भातील चौकशी सुरु असून मृताच्या नातेवाईकांचे जबाब घेतले जात आहेत.