यवत (दौंड) मध्ये तणाव शिगेला: शिवप्रतिमा विटंबनेवरून दोन गटांत दंगल! दुकाने आणि घरे जाळली!

यवत (दौंड) मध्ये तणाव शिगेला: शिवप्रतिमा विटंबनेवरून दोन गटांत दंगल! दुकाने आणि घरे जाळली!

पुणे जिल्ह्यातील यवतमध्ये तणाव शिगेला! शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या विटंबनेवरून उसळली दंगल!

दौंडजवळील यवत गावात आज सकाळी मोठा अनुचित प्रकार घडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केल्याच्या आरोपावरून दोन गटांमध्ये तुफान वाद आणि दंगल उसळली. सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यावरून कालपासूनच तणावाचे वातावरण होते. पण आज सकाळी थेट दुकाने, घरे, बेकऱ्या व धर्मस्थळांवर हल्ला झाला आणि काही ठिकाणी आगजनीची घटना घडली.

नेत्यांची उपस्थिती आणि नंतर उसळलेली दंगल

या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि किन्नर आखाड्याच्या प्रमुख स्वामी हेमांगी सखीजी यांनी काल यवतमध्ये भेट देत भाषणे केली. त्यांच्या पाठ फिरताच गावात अचानक परिस्थिती हाताबाहेर गेली आणि सकाळपासूनच बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.

आगी, दंगल आणि अश्रुधुराच्या नळकांड्या

सकाळीच जमावाने काही ठिकाणी घरे आणि दुकानांना आग लावली. पोलीस आणि दंगल नियंत्रण पथकाने घटनास्थळी दाखल होत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. पण यामुळे तणाव आणखी वाढल्याचे पाहायला मिळाले.

पोलिसांची तत्काळ कारवाई

पोलिसांनी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी काही आरोपींना अटकही करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारी बंदोबस्त लावण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींचं आवाहन

दौंडचे आमदार राहुल कुल यांनी लोकांनी संयम बाळगावा आणि शांतता ठेवावी, असे आवाहन केलं. “प्रशासन लोकांना विश्वासात घेऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करत आहे. वातावरण निवळत असून, सर्वांनी शांतता राखावी,” असं आमदार कुल यांनी सांगितलं.

यवत परिसरात उद्भवलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. समाजात शांतता आणि सौहार्द कायम राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणं आणि त्यावरून निर्माण होणारा तणाव याचा परिणाम सर्व समाजावर होतो, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *