पुणे ते अहिल्यानगर रेल्वे मार्गामुळे प्रवासात क्रांती!
पुणे शहरातून नगरच्या दिशेने जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे! आता पुणे ते अहिल्यानगर हे अंतर बसऐवजी
फक्त दीड तासात पार करता येणार आहे. कारण लवकरच पुणे-अहिल्यानगर समांतर दुहेरी रेल्वेमार्गाचा भव्य प्रकल्प प्रत्यक्षात येणार आहे. हा नवीन रेल्वेमार्ग पुणे-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाला समांतर असणार आहे आणि यामुळे महामार्गावरील वाढती वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
डीपीआर सादर – प्रकल्पाला वेग
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. या कंपनीने या प्रकल्पाचा अंतिम डीपीआर (Detailed Project Report) सादर केला आहे. एकूण ९८.५७५ किमी लांबीचा हा दुहेरी मार्ग असेल, जो प्रवाशांना जलद, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक पर्याय देणार आहे.
१२ नवीन स्थानकांसह रेल्वेचा विस्तार
या प्रकल्पामध्ये एकूण १२ नवीन रेल्वे स्थानके प्रस्तावित आहेत. त्यामध्ये 1. लोणी काळभोर, 2. कोलवडी, 3. वाघोली, 4. वढू, 5. जातेगाव, 6. रांजणगाव एमआयडीसी, 7. कोहकडी, 8. सुपे एमआयडीसी, 9. कामरगाव, 10. चास आणि 11. अहिल्यानगर या स्थानकांचा समावेश आहे. यातील रांजणगाव व सुपे एमआयडीसी ही मुख्य स्थानके असतील.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये:
- एकूण लांबी: ९८.५७५ किमी
- तालुके: हवेली (6.7 किमी), शिरूर (38.875 किमी), पारनेर व अहिल्यानगर (53.145 किमी)
- वेग मर्यादा: 160 किमी/तास
- प्रकल्प कालावधी: 4 वर्षे
- प्रस्तावित गाड्या: द्रुतगती प्रवासी गाड्या
- भूसंपादन: ७८५.८९८ हेक्टर जमीन, त्यापैकी शिरूर तालुक्यात सर्वाधिक
भूसंपादन व तालुकानिहाय जमीन
या प्रकल्पासाठी शिरूर, हवेली, पारनेर व अहिल्यानगर या चार तालुक्यांतील जमिनीचे भूसंपादन होणार आहे. सर्वाधिक जमीन शिरूर तालुक्यातील आहे. एकूण ७८५ हेक्टरमध्ये ७२७ हेक्टर जमीन खासगी आहे, तर उर्वरित सरकारी व वनजमीन आहे.
दौंड ला वळसा घालण्यास करा रामराम!
सध्या पुण्यातून उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांना दौंड मार्गे जावे लागते, ज्यामुळे वेळ आणि इंधन दोन्ही खर्च होते. हा नवीन मार्ग त्या वेळेत मोठी बचत करेल. शिवाय महामार्गावरील वाहतूककोंडीपासून प्रवाशांची सुटका होईल
हा प्रकल्प पूर्णत्वास गेला की, पुणे ते नगर केवळ दीड तासात, 160 किमी/तास वेगाने रेल्वेने जाणे शक्य होणार आहे. वाहतुकीची आधुनिक यंत्रणा, सोयीस्कर स्थानके आणि जलद गाड्या यामुळे हा प्रकल्प पुणे-नगर प्रवासात क्रांती घडवू शकतो.
हा प्रकल्प केवळ पुणे आणि नगर जिल्ह्याच्या विकासासाठीच नव्हे तर प्रवाशांच्या दृष्टीने एक महत्वाची उपलब्धी ठरणार आहे. रोजगार, व्यापार आणि स्थानिक विकासासाठी हा रेल्वे मार्ग अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.