सोलापूर | 5 ऑगस्ट 2025
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून त्यांनी 27 ऑगस्ट रोजी मुंबईकडे मोठा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. ‘एक घर, एक गाडी’ या संकल्पनेतून त्यांनी मराठा समाजातील प्रत्येक कुटुंबाला मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यावेळी जरांगेंनी राज्य सरकारला थेट इशाराही दिला आहे की, आरक्षणाच्या मुद्द्यावर चालढकल खपवून घेतली जाणार नाही.
जरांगे पाटील यांनी सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात मराठा बांधवांशी संवाद साधला व पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, “मराठा समाजाच्या मुलांना कोणीही काठीने डिवचायचं नाही. आम्ही शांततेत मुंबईला येत आहोत. कोणीही दगडफेक, जाळपोळ किंवा वादग्रस्त कृती करू नये. जे कोणी असे वर्तन करतील त्यांना तात्काळ पोलिसांच्या ताब्यात द्या.”
तसेच जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका करताना म्हटले की, “कोणीही आंदोलनात अशांतता निर्माण करत असेल, तर समजा तो सरकारचा माणूस आहे. राज्य सरकारने नाटकं करू नयेत. आंतरवली सराटी येथील प्रकार पुन्हा घडू नयेत.” पुढे बोलताना त्यांनी इशारा दिला की, “जर सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर याचा परिणाम मोदी सरकारवरही होणार आहे.”
या आंदोलनामागे जरांगेंचा स्पष्ट उद्देश आहे – मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून कायमस्वरूपी आरक्षण मिळावे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी यासाठी उपोषण, यात्रा, संवाद या माध्यमांतून समाजात जागरूकता निर्माण केली आहे. आता पुन्हा एकदा मोठ्या निर्धाराने त्यांनी मोर्चा पुकारला आहे.
राज्य सरकारने या मोर्चाकडे गांभीर्याने पाहावे आणि शांततामय मार्गाने मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.