इयत्ता आठवीच्या नवीन समाजशास्त्र पुस्तकांमध्ये मुघल साम्राज्याशी संबंधित माहितीमध्ये एनसीईआरटी (NCERT) बोर्डाने काही महत्वाचे आणि वादग्रस्त बदल केले आहेत. इतिहासात अनेकदा चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलेल्या मुघल शासकांबाबत आता अधिक स्पष्ट आणि थेट मांडणी करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी नव्याने जाणीव निर्माण होण्याची शक्यता आहे.
नवीन पाठ्यपुस्तकांनुसार, मुघल साम्राज्याचा पाया घालणारा बाबर हा एक क्रूर विजेता होता, असे वर्णन केले गेले आहे. पूर्वीच्या पुस्तकांमध्ये बाबरचे चित्रण तुलनेत सौम्य आणि सामर्थ्यशाली शासक म्हणून केले जात होते, मात्र या नव्या बदलांमुळे त्याच्या आक्रमणाच्या पद्धती आणि धार्मिक दृष्टिकोन अधिक स्पष्टपणे विद्यार्थ्यांपुढे मांडले गेले आहेत.
पुस्तकात बदल का केले ?
पुस्तकातील बदलांबाबत अद्याप एनसीईआरटीकडून कोणतेही उत्तर किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. पुस्तकांमध्ये बदल झाल्यानंतर वाद निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी NCERT ने एक युक्ती अवलंबली आहे. त्यांनी एक विशेष नोंददेखील लिहिली आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, ‘भूतकाळातील घटनांसाठी आज कोणालाही दोषी ठरवू नये.’
NCERT च्या या बदलांनी पुन्हा एकदा शिक्षण क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. इतिहासाचे पुस्तक म्हणजे केवळ घटनांची मांडणी नसून त्या घटनांचे सुस्पष्ट विश्लेषण आणि संदर्भ देणे आवश्यक असते. त्यामुळे अशा बदलांमुळे इतिहासाच्या अभ्यासात पारदर्शकता येईल, असे काही शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र दुसरीकडे, काही गटांनी या बदलांचा राजकीय हेतू असल्याचा आरोप केला आहे.
NCERT ने मुघल इतिहासाबाबत केलेले हे बदल शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरणार आहेत. विद्यार्थ्यांनी इतिहासाचा अभ्यास करताना घटनांचे दोन्ही पैलू समजून घेणे आवश्यक आहे. अशा बदलांमुळे इतिहासाचे नवे दर्शन घडेल, मात्र त्यासोबत तटस्थतेचा आग्रहही तितकाच आवश्यक आहे.