लोकप्रिय विनोदी कलाकार भाऊ कदम यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे याबद्दल भावनिक प्रतिक्रिया दिली. “मी निलेश साबळेसाठी देवाकडे प्रार्थना करतो,” असे भाऊ कदम म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी साबळेच्या आगामी सिनेमाबद्दलही माहिती दिली.
‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमामुळे महाराष्ट्रासह जगभरात प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या टीममध्ये भाऊ कदम आणि निलेश साबळे हे दोघेही महत्त्वाचे सदस्य आहेत. तब्बल १० वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केलेल्या या शोने अनेक कलाकारांना लोकप्रिय केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी निलेश साबळेने उत्तम प्रकारे सांभाळली होती.
यानंतर तो ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या शोद्वारे पुन्हा प्रेक्षकांसमोर आला. आता तो लवकरच त्याचा नवा सिनेमा ‘चंद्रकांता’ घेऊन येत आहे. या चित्रपटाबद्दल माहिती देताना भाऊ कदम म्हणाले – “निलेश माझा खूप चांगला मित्र आहे. तो प्रामाणिक आणि मेहनती आहे. त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तो मला सामावून घेतो. आता तो दिग्दर्शन, लेखन आणि अभिनय अशा तिन्ही भूमिका स्वतः सांभाळत आहे. इतक्या मोठ्या कास्टिंगसह ‘चंद्रकांता’ सारखा सिनेमा तो पहिल्यांदाच करत आहे. त्याच्या यशासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.”
भाऊ कदम यांच्या या विधानामुळे प्रेक्षकांमध्ये ‘चंद्रकांता’ सिनेमाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी हा चित्रपट खास ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.