WWE सुपरस्टार बिल गोल्डबर्गचं आयुष्यभराचं स्वप्न सुरक्षा कारणांमुळे रद्द – जाणून घ्या नेमकं प्रकरण
WWE हॉल ऑफ फेमर बिल गोल्डबर्ग याने आपल्या निवृत्तीचा सामना इस्रायलमध्ये खेळण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मात्र, इस्रायल आणि गाझामधील संघर्ष व इराणशी वाढलेला तणाव यामुळे हे स्वप्न अपूर्ण राहिलं. सुरक्षा कारणास्तव तेल अवीवमधील नियोजित सामना रद्द करण्यात आला आणि तो दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आला.
गोल्डबर्गचं खास स्वप्न – धर्म आणि देशासाठी निवृत्तीचा सामना
गोल्डबर्गने सांगितलं, “माझं स्वप्न होतं की माझा शेवटचा सामना इस्रायलमध्ये व्हावा. मी माझ्या ज्यू वारशाचा सन्मान करायचा होता. मी धर्मासाठी काहीही करायला तयार होतो.”
मात्र, इस्रायलमधील अस्थिर परिस्थिती आणि इराणसोबत निर्माण झालेल्या युद्धसदृश स्थितीमुळे त्याच्या निवृत्तीच्या लढतीवर गालबोट लागलं. अखेर 12 जुलै रोजी अटलांटा (अमेरिका) येथे हा सामना पार पडला.
शेवटच्या सामन्यात पराभव – पण गौरव कायम
अटलांटामध्ये झालेल्या या निवृत्ती सामन्यात गोल्डबर्गने WWE च्या नवीन जागतिक हेवीवेट चॅम्पियनशिपमध्ये गुंथरकडून पराभव पत्करला. तरीही, त्याच्या प्रेक्षकांवरील प्रभाव आणि लोकप्रियतेला काहीही कमी झालं नाही.फुटबॉलपासून कुस्तीपर्यंत – गोल्डबर्गचा प्रेरणादायी प्रवास
बिल गोल्डबर्गचा जन्म तुलसा, ओक्लाहोमा (अमेरिका) येथे झाला. त्याने शालेय जीवनात आणि जॉर्जिया विद्यापीठात फुटबॉल खेळला. पुढे NFL संघ Atlanta Falcons सोबत 14 सामने खेळले. मात्र पेल्विक दुखापतीमुळे त्याची फुटबॉल कारकीर्द लवकरच संपुष्टात आली.
दुखापतीनंतर नवी दिशा – कुस्तीचा नवा अध्याय
फुटबॉल सोडून दिल्यानंतर गोल्डबर्गने वैयक्तिक प्रशिक्षक म्हणून काम सुरु केलं. त्याच दरम्यान, कुस्ती प्रशिक्षक लॅरी शार्प यांची नजर त्याच्यावर पडली. शार्पने त्याला कुस्तीचे प्रशिक्षण देण्याची संधी दिली, आणि गोल्डबर्गने ती संधी लीलया स्वीकारली.
शार्पच्या मॉन्स्टर फॅक्टरीमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर, गोल्डबर्गने 1990 च्या दशकात WCW मध्ये पदार्पण केलं. 173 सलग विजयांसह विक्रम, ताकदवान शैली, आणि प्रेक्षकांमधील लोकप्रियता यामुळे तो स्टार बनला. WWE मधील यशस्वी कारकीर्द
2003 मध्ये गोल्डबर्गने WWE मध्ये प्रवेश केला. तिथेही त्याने चांगली कामगिरी केली आणि जगभरात प्रसिद्धी मिळवली. 2018 मध्ये त्याला WWE हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आलं.
त्याची जीवनकहाणी म्हणजे धैर्य, जिद्द आणि आपल्या मूळाशी नातं टिकवण्याचा आदर्श. फुटबॉलमधून बाहेर फेकला गेल्यानंतरसुद्धा त्याने हार मानली नाही, उलट नव्या क्षेत्रात यश मिळवलं.