भाजपमध्ये अंतर्गत वादाची धग! मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक- राजीव गोलीवार यांचा राजीनामा!

भाजपमध्ये अंतर्गत वादाची धग! मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक- राजीव गोलीवार यांचा राजीनामा!

भाजपमध्ये अंतर्गत वादाची धग! मुनगंटीवारांचे कट्टर समर्थक राजीव गोलीवार यांचा राजीनामा

चंद्रपूर | स्थानिक प्रतिनिधी: चंद्रपूर भाजपातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले आहेत. आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक आणि माजी नगरसेवक राजीव गोलीवार यांनी भाजप महानगर उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. याआधी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचे समर्थक असलेल्या राजेंद्र अडपेवार यांनीही काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. सलग दोन निष्ठावान कार्यकर्त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षात खळबळ उडाली आहे.

वाढदिवस कार्यक्रमावरून नोटीस

गोलीवार यांच्या मते, एका वरिष्ठ नेत्याच्या वाढदिवस कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यामुळे त्यांना पक्षाकडून थेट नोटीस पाठवण्यात आली. त्यांनी स्पष्ट केले की, “आम्ही गेली 35 वर्षे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. वाढदिवसाला हजर न राहिल्यास स्पष्टीकरण विचारणारी नोटीस मिळणे हा अपमान आहे. आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत, मजूर नाही.” ही नाराजी त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात मांडली.

जुन्या कार्यकर्त्यांचा अपमान?

गोलीवार यांनी राजीनाम्यात नमूद केले की, पक्षात जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना सन्मान मिळत नाही, उलट इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांना महत्त्वाची पदे दिली जात आहेत. या प्रकारामुळे जुने कार्यकर्ते दुखावले गेले असून पक्षातील शिस्तीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

आणखी राजीनाम्यांची शक्यता

सूत्रांच्या माहितीनुसार, या राजीनाम्यानंतर पक्षातील काही इतर सदस्यही राजीनाम्याचा विचार करत आहेत. यामुळे चंद्रपूर भाजपात आणखी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

पूर्वी न घडलेले प्रसंग

राज्यातील भाजपमध्ये अशा प्रकारचा उघड अंतर्गत वाद पूर्वी क्वचितच दिसून आला आहे. माजी मंत्री हंसराज अहिर आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यातील मतभेद याआधीही चर्चेत होते. आता किशोर जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशानंतर निर्माण झालेली नाराजी उघडपणे समोर येत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

चंद्रपूर भाजपमधील ही घडामोड केवळ स्थानिक पातळीपुरती मर्यादित नसून, पक्षातील गटबाजीचे संकेत देते. पुढील काही दिवसांत या वादाचा पक्षाच्या संघटनावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *