मुंबई – महाराष्ट्र विधिमंडळाच्या परिसरात आज पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसून आलं. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद आता त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक स्वरूपात बदलल्याची घटना समोर आली आहे.

आज सकाळी विधानभवनाच्या लॉबीमध्ये आव्हाड आणि पडळकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याचा प्रकार घडला. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावरही झपाट्याने व्हायरल झाला असून, त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खळबळ उडाली आहे.
कालच, विधान भवनाच्या परिसरात जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यात वाद झाला होता. गाडीला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून सुरु झालेली शाब्दिक चकमक नंतर अश्लील भाषेपर्यंत पोहोचली. उपस्थितांनी वाद थांबवला असला तरी याचे पडसाद आज मोठ्या प्रमाणात उमटले. सध्या विधानभवन प्रशासनाकडून या घटनेचा तपास सुरु आहे. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई होण्याची शक्यता असून, सर्व विरोधी पक्षांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
राजकारणातील मतभेद हे चर्चेतून मिटवले गेले पाहिजे, हिंसक मार्गाने नव्हे. विधानभवनात अशा प्रकारचे हाणामारीचे प्रसंग लोकशाहीची शान कमी करतात. नागरिकांनीही अशा घटनांना पाठिंबा देण्याऐवजी संयम आणि सूज्ञता दाखवणं आवश्यक आहे. हा राडा शांत झाल्यानंतर आता आज जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच हाणामारी झालेली दिसून आली. यामुळे विधानभवनात चांगलाच गोंधळ उडालेला बघायला मिळाला. या तुंबळ हाणामारीचा व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे.