दिल्लीच्या दिशेने झेपावलेले एकनाथ शिंदे… आणि पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते एकनाथ शिंदे यांनी आज (३० जुलै) अचानक दिल्ली गाठल्याने सत्ताकेंद्रात उलथापालथीच्या चर्चा पुन्हा तापल्या आहेत. याआधीही शिंदे विधीमंडळ अधिवेशनादरम्यान अचानक रात्री दिल्लीला गेले होते आणि त्यांच्या दौऱ्याची माहिती खुद्द शिवसेनेतील मंत्र्यांनाही नव्हती. त्यामुळे, या दौऱ्यामागे नेमकं काय आहे, याचे वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे आपल्या पक्षाच्या खासदारांसोबत बैठकीसाठी गेले असावेत. संसदेत सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्यात पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी ही बैठक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण दुसरीकडे, महायुती सरकारमधील अंतर्गत विसंवाद, भाजप आमदारांचे शिंदेंच्या नगरविकास खात्याबाबतचे तक्रारी, फडणवीसांनी निधीवरील नियंत्रण घेतल्याची चर्चा – या सगळ्यामुळे हा दौरा ‘केवळ नियमित’ वाटत नाही.
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा कॅन्टीन वाद, संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगेसह व्हिडीओ, आणि भरत गोगावले यांचा जादूटोण्याचा वादग्रस्त फोटो – या सर्व घटनांमुळे शिवसेनेतील काही मंत्र्यांवर घरचा रस्ता दाखवण्याच्या चर्चांना जोर आला आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत कारवाई झालेली नाही.
याशिवाय, शिंदेंवर भ्रष्टाचाराच्या आरोपांचाही शिंतोडा उडाल्यामुळे चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. काही निर्णयांना उपमुख्यमंत्री फडणवीसांनी स्थगिती दिल्याचेही बोलले जात आहे.
एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनात लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. स्थानिक कार्यकर्ते आणि सामान्य जनतेशी थेट संवाद साधणारे नेते ही त्यांची USP आहे. मात्र, सत्तेत आल्यानंतर घेतलेले काही निर्णय वादात सापडल्याने त्यांची प्रतिमा धोक्यात आली आहे.
अशा पार्श्वभूमीवर, शिंदे यांचा दिल्ली दौरा केवळ पक्ष बैठकीपुरता आहे की महायुतीतील संभाव्य बदलांचा सुरुवातीचा टप्पा? याचे उत्तर लवकरच स्पष्ट होईल.