26/11 हल्ल्यात लढलेला माजी NSG कमांडो बजरंग सिंग गांजा रॅकेटचा सूत्रधार; राजस्थान ATS कडून अटक!

26/11 हल्ल्यातील शूर कमांडो बजरंग सिंग आता ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाइंड!

जयपूर : 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेलमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांशी दोन हात करत शौर्य दाखवणारे माजी NSG कमांडो बजरंग सिंग यांना राजस्थान ATS व ANTF पथकाने अटक केली आहे. या अटकेनंतर संपूर्ण राजस्थानभर खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बजरंग सिंग हे मोठ्या गांजा तस्करी रॅकेटचे सूत्रधार असून त्यांच्याकडे 200 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

दोन महिन्यांची पाळत आणि गुप्त कारवाई

राजस्थान ATS ने ‘ऑपरेशन गांजनेय’ अंतर्गत तब्बल दोन महिने तांत्रिक पाळत ठेवून ही कारवाई केली. बुधवारी रात्री चुरु परिसरातून बजरंग सिंग यांना पकडण्यात आले. त्यांनी ओडिशा आणि तेलंगणातून मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी करून राजस्थानमध्ये रॅकेट चालवले असल्याचे उघड झाले. त्यांच्यावर 25 हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

बजरंग सिंगची कारकीर्द

मूळचे सीकर जिल्ह्यातील करंगा गावचे असलेले बजरंग सिंग यांनी सीमा सुरक्षा दलातून (BSF) आपली कारकीर्द सुरू केली होती. कुस्तीच्या कौशल्यामुळे व उत्कृष्ट सेवेमुळे त्यांची निवड राष्ट्रीय सुरक्षा दल (NSG) मध्ये झाली.
सात वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये भाग घेतला. विशेषतः 2008 मधील 26/11 मुंबई हल्ल्यात ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांशी लढताना ते अग्रभागी होते. 2021 मध्ये ते NSG मधून निवृत्त झाले.

सैन्यापासून राजकारण, आणि नंतर गुन्हेगारीकडे वळण

निवृत्तीनंतर बजरंग सिंग यांनी स्थानिक राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांनी अवैध मार्ग स्वीकारला. जुन्या संपर्कांचा वापर करून त्यांनी ड्रग्ज तस्करीचे जाळे उभारले. लहान व्यवहाराऐवजी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गांजाच्या खेपा हलवण्यास सुरुवात केली.

पोलिसांचा मोठा विजय

वरिष्ठ पोलीस अधिकारी विकास कुमार यांनी सांगितले की, “बजरंग सिंगसारख्या शिस्तबद्ध आणि चतुर गुन्हेगाराला पकडणे हे सोपे नव्हते. परंतु अनेक आठवड्यांच्या नियोजन, गुप्त माहिती आणि पाळत यामुळे ही अटक शक्य झाली. या कारवाईनंतर राजस्थानमधील दहशतवाद व अंमली पदार्थ यांच्यातील संबंधांना मोठा धक्का बसला आहे.”

एकेकाळी देशासाठी जीव धोक्यात घालून लढणारा हा कमांडो, चुकीच्या मार्गावर वळाल्याने अखेरीस पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या अटकेनंतर गुन्हेगारी रॅकेट्सना मोठा धक्का बसणार असून, ड्रग्जविरोधी मोहिमेला नवी गती मिळणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top