पुण्यातील रेव्ह पार्टीवर छापा, खळबळजनक अटक
पुण्यात शनिवारी (२७ जुलै) पहाटे अमली पदार्थविरोधी पथकाने एका कथित रेव्ह पार्टीवर छापा टाकून मोठी कारवाई केली. या पार्टीत एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली. या घटनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
गिरीश महाजनांचा खडसेंवर प्रहार
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना खडसे यांना थेट टोला लगावला. “जर खडसे यांना ही कारवाई होणार असल्याची कल्पना आधीपासून होती, तर त्यांनी जावयाला सावध का केले नाही? कुणी बाळाला कडेवर घेऊन पार्टीत बसवले का?”, असा तीव्र सवाल महाजन यांनी उपस्थित केला. त्यांनी स्पष्ट केले की, “कारवाई झाली असताना ती षड्यंत्र म्हणून नाकारणे चुकीचे आहे. तपासातून सगळं स्पष्ट होईल.”
एकनाथ खडसे यांचे स्पष्टीकरण
या घटनेवर खडसे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सध्याचं वातावरण पाहता काहीतरी घडू शकतं याची मला पूर्वकल्पना होती. हे एक राजकीय षड्यंत्र आहे.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “जर ती खरी रेव्ह पार्टी असेल आणि माझे जावई दोषी असतील, तर त्यांना शिक्षा व्हावी. पण कोणालाही चुकीच्या पद्धतीने अडकवायचा प्रयत्न केला जाईल, तर मी विरोध करीन.”
‘संस्कृती नासविण्याचे काम सुरु आहे’ – मंगेश चव्हाण यांचा आरोप
या प्रकरणात भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनीही आपली भूमिका मांडली. त्यांनी आरोप केला की, “प्रांजल खेवलकर यांनीच ही पार्टी आयोजित केली होती. त्यांच्या नावावरच रूम बुक करण्यात आली होती. या पार्टीमध्ये ड्रग्ज आणि मद्यप्राशन झाले असल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे ही गंभीर बाब आहे.”
त्यांनी यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याचीही मागणी केली. तसेच, “खडसे यांचे या ड्रग्ज व्यवहारात आर्थिक हितसंबंध होते का?”, याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांची संयमित प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाबाबत विचारले असता, त्यांनी स्पष्ट केले की, “रेव्ह पार्टीविषयीची माहिती मला प्रसारमाध्यमांतूनच मिळाली आहे. पोलिस अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच यावर अधिक बोलता येईल.”
राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी पेटले राजकारण
या घटनेने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तणाव वाढवला आहे. संजय राऊत यांनी यावरून गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना म्हटले की, “गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटला आहे.” यावर महाजन यांनी संयमित प्रत्युत्तर दिले – “मी त्यांना सांड म्हणणार नाही. ते मोकाट आहेत म्हणून ते कोणालाही काहीही बोलतात.”