मुंबई | ऑगस्ट 2025
बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांचे वैवाहिक जीवन गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. तब्बल 38 वर्षांचा संसार एकत्र घालवल्यानंतर आता सुनीता यांनी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणामुळे चाहत्यांमध्ये आणि चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे.
गंभीर आरोपांनी वादंग
मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता आहुजा यांनी गोविंदावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी फसवणूक, मानसिक छळ आणि क्रूरतेची वागणूक दिल्याचा दावा केला आहे. इतकेच नव्हे तर, गेल्या काही वर्षांपासून गोविंदा वेगळं राहत असल्याचंही सुनीता यांनी आपल्या याचिकेत नमूद केलं आहे.
डिसेंबर 2024 मध्येच सुनीता यांनी वांद्रे कुटुंब न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. ही याचिका हिंदू विवाह अधिनियम 1955 च्या कलम 13 (1) (i), (ia), (ib) अंतर्गत दाखल करण्यात आली आहे.
न्यायालयीन प्रक्रिया
न्यायालयाकडून गोविंदाला समन्स बजावण्यात आलं, परंतु तो हजर झाला नाही. दुसरीकडे सुनीता मात्र नियमितपणे न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी होत असल्याचे अपडेट्स मिळाले आहेत. त्यामुळे प्रकरण आणखी गडद होत चालल्याचे दिसते.
युट्यूब व्हिडिओतून दिलेली प्रतिक्रिया
अलीकडेच सुनीता आहुजा यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवर व्हिडिओ शेअर करत अफवांवर प्रतिक्रिया दिली होती. त्यात त्या म्हणाल्या होत्या की, “मी माझ्या देवीकडे प्रार्थना केली होती की मला असं लग्न मिळू दे जिथे मी आनंदी राहीन. देवीने माझी इच्छा पूर्ण केली. मला दोन सुंदर मुलं दिली. आज मी जे काही आहे ते माझ्या कुटुंबामुळे आहे.”
मात्र या सकारात्मक विधानानंतरही त्यांच्या घटस्फोट अर्जाच्या बातम्या समोर येत आहेत, ज्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
चाहत्यांमध्ये खळबळ
गोविंदा आणि सुनीता आहुजा यांचे नाते बॉलिवूडमध्ये आदर्श मानले जात होते. दोघांनी अनेक चढ-उतार अनुभवले, पण एकत्र राहिले. मात्र आता गंभीर आरोपांमुळे त्यांच्या संसारावर मोठं संकट आलं आहे.
चित्रपटसृष्टीतील काही जाणकारांच्या मते, या घटस्फोटाच्या याचिकेमुळे गोविंदाच्या प्रतिमेवरही परिणाम होऊ शकतो. तर काही चाहत्यांना अजूनही आशा आहे की, हे प्रकरण मैत्रीपूर्ण पद्धतीने मिटेल.
सुनीता आहोजांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे गोविंदा आणि त्यांचं वैवाहिक जीवन चर्चेत आलं आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून पुढील काही महिन्यांत या प्रकरणाचा निकाल काय लागेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहील.