महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असून कोकण, मुंबई-पुणे घाट परिसरात मुसळधार पावसाचा तडाखा सुरू आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि घाटमाथ्याच्या जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
रत्नागिरीत पूरस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पावसाने परिस्थिती गंभीर झाली. खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, तर संगमेश्वर व राजापूरमधील नद्याही इशारा पातळीवर पोहोचल्या. खेड-दापोली राज्य मार्ग दिवसभर बंद ठेवावा लागला. खेड शहरातील मटण मार्केट परिसर पाण्याखाली गेला होता.
नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून 145 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. दरम्यान, रत्नागिरी-कोल्हापूरला जोडणाऱ्या आंबा घाटात दरड कोसळून वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
मुंबई-पुणे आणि घाटमाथ्यावर अलर्ट
सोमवारी झालेल्या पावसामुळे मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर घाट भागात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
- 19 ऑगस्ट रोजी (मंगळवार) मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट येथे ऑरेंज अलर्ट आहे.
- तर नाशिक, धुळे, नंदुरबार, पुणे, बीड, लातूर, नांदेड, गडचिरोली इत्यादी जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पूर आणि धरण क्षेत्रातील परिस्थिती
- कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे सहा दरवाजे उघडून 21,300 क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
- रायगडमधील महाड येथे सावित्री नदीने इशारा पातळी ओलांडली, तर काही गावांचा संपर्क तुटला.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गड नदी तुडुंब भरून वाहत असून रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला.
पावसाचा ताज्या प्रमाणात आकडा (रत्नागिरी जिल्हा – सोमवारी सकाळपर्यंत)
- मंडणगड : 124 मिमी
- खेड : 170 मिमी
- दापोली : 154 मिमी
- चिपळूण : 147 मिमी
- गुहागर : 113 मिमी
- संगमेश्वर : 163 मिमी
- रत्नागिरी : 119 मिमी
- लांजा : 116 मिमी
- राजापूर : 99 मिमी
पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोकण, घाटमाथा आणि मुंबई-पुणे परिसरातील नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. प्रशासनानेही नदीकाठच्या भागातील गावांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.