भारताचा थरारक विजय! सचिन आणि विराट तसेच पंतपासून गांगुली पर्यंत सर्वांच्याच भावनिक प्रतिक्रिया!

भारताचा थरारक विजय! सचिन आणि विराट तसेच पंतपासून गांगुली पर्यंत सर्वांच्याच भावनिक प्रतिक्रिया!

भारताने इंग्लंडविरुद्ध ओव्हलवर झालेल्या पाचव्या कसोटीत 6 धावांनी थरारक विजय मिळवला आणि 2025 ची ‘अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी’ 2-2 अशी बरोबरीत संपवली. या ऐतिहासिक विजयाने क्रिकेटविश्वात भावनांचा महापूर उसळला. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, युवराज सिंग, सौरव गांगुली, ऋषभ पंत यांच्यासारख्या दिग्गजांनी टीम इंडियाचं भरभरून कौतुक केलं.

शेवटच्या दिवशी क्रिकेटचा जबरदस्त थरार

चौथ्या दिवशी इंग्लंड 6 बाद 339 धावांवर असताना 35 धावांची गरज होती. मात्र, पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. अखेरच्या दिवशी मैदानात उतरलेल्या भारताने अवघ्या काही षटकांत सामना पलटवत इंग्लंडला 367 धावांवर गारद केलं. मोहम्मद सिराजच्या भन्नाट स्पेलमुळे आणि प्रसिद्ध कृष्णाच्या भेदक माऱ्यामुळे भारताने विजय खेचून आणला.

सचिन तेंडुलकर : “अंगावर शहारे आले!”

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सामना पाहिल्यानंतर X (ट्विटर) वर लिहिलं, “शहारे आणणारा सामना होता. मालिका 2-2, परफॉर्मन्स 10/10. भारताचा सुपरमॅन!” – असे म्हणत त्यांनी सिराजच्या कामगिरीचं विशेष कौतुक केलं.

युवराज सिंग : “खरं कमबॅक असं असतं!”

युवराजने लिहिलं की, “टेस्ट क्रिकेटमधलं असं पुनरागमन म्हणजेच आत्मविश्वास. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारताने अफलातून जिद्द दाखवली. सिराज, कृष्णा, आकाशदीप – कमाल!”

सौरव गांगुली : “सिराज कधीच निराश करत नाही!”

माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी ट्विट करत सांगितलं की, “सिराज कोणत्याही कोपऱ्यात खेळताना टीमला कधीच निराश करत नाही. यशस्वी जैस्वाल, वॉशिंग्टन सुंदर, पंत – सगळ्यांनी अप्रतिम खेळ केला.”

शिखर धवन : “नेतृत्व पॉइंटवर होतं!”

शिखर धवन यांनी लिहिलं की, “शुभमन गिलचं नेतृत्व जबरदस्त. सिराज आणि कृष्णा – दोघांनी जे केलं, त्याला तोड नाही. खेळाडूंचा संयम, शिस्त आणि आत्मविश्वास पाहून अभिमान वाटतो.”

ऋषभ पंत : “ही टीम समर्पणासाठी ओळखली जाते”

दुखापतीमुळे अंतिम टेस्टमधून बाहेर राहिलेल्या ऋषभ पंत याने लिहिलं की, “ही टीम परिस्थितीशी झुंजणारी आहे. त्याग केला पण त्याहून जास्त काही मिळालं. सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंना सलाम!”

विराट कोहली : “सिराजसाठी खूप आनंद वाटतोय”

विराट कोहली ने सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाच्या जबरदस्त प्रदर्शनाचं अभिनंदन करत लिहिलं, “सिराजने स्वतःला झोकून दिलं. त्याच्यासाठी मनापासून आनंद होतोय.”

इरफान पठान आणि हरभजन सिंग यांचं कौतुक

इरफान पठान म्हणतो, “क्रिकेट कोणासाठी थांबत नाही हे या मालिकेने पुन्हा दाखवून दिलं.”
तर हरभजन सिंग म्हणतो, “सिराज आणि कृष्णा – अफलातून! खेळाडूंनी मन जिंकलं.”

युवा टीमची जिद्द, संयम आणि विजयाची तहान!

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा टीमने संपूर्ण देशाचं मन जिंकलं आहे. जिथे विजय अशक्य वाटत होता, तिथे विजय खेचून आणणं हीच भारतीय संघाची खरी ओळख आहे. या मालिकेने पुन्हा सिद्ध केलं की, टेस्ट क्रिकेट अजूनही सर्वाधिक रोमांचक आणि अस्सल क्रिकेट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *