युनूस सरकारला भारताचा कडक इशारा! तागाच्या वस्तूंवर नवे व्यापार निर्बंध लागू
नवी दिल्ली | भारत आणि बांगलादेश यांच्यातील व्यापारी संबंधात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. युनूस सरकारच्या काळात भारताविरोधी धोरणांमुळे नाराज असलेल्या भारताने आता थेट व्यापारावर प्रहार केला आहे. बांगलादेशातून येणाऱ्या तागाच्या वस्तूंवर (Jute Products) भारताने कडक निर्बंध लावले आहेत.
फक्त न्हावा शेवा बंदरातूनच आयात
परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) जाहीर केलेल्या नवीन नियमांनुसार, तागापासून बनवलेले कपडे, दोरखंड आणि पोती यांसारख्या वस्तू भारतात आता फक्त न्हावा शेवा बंदरातूनच आयात करता येतील. यापूर्वी या वस्तू भारत-बांगलादेश सीमेवरील अनेक भू-सीमा बंदरांमधून येऊ शकत होत्या. हा निर्णय दोन्ही देशांच्या व्यापारावर मोठा परिणाम करणार आहे.
यापूर्वीही निर्बंध लागू
याआधी भारताने बांगलादेशातून येणाऱ्या रेडीमेड कपडे आणि प्लास्टिकच्या वस्तूंवर निर्बंध लावले होते. मे महिन्यात, बांगलादेशातून येणाऱ्या रेडीमेड कपड्यांना फक्त कोलकाता आणि न्हावा शेवा बंदरातूनच आयात करण्यास परवानगी देण्यात आली होती. भारताचे म्हणणे आहे की, बांगलादेश भारतीय वस्तूंवर अनावश्यक टॅरिफ लावून आणि लँड पोर्ट्सवर प्रवेश नाकारून आर्थिक नुकसान करत आहे.
जशास तसे उत्तर
बांगलादेश भारतीय वस्तूंवर निर्बंध लावतो, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने हे पाऊल उचलले आहे. विशेषतः उत्तर-पूर्व राज्यांमध्ये जाणाऱ्या वस्तूंवर परिणाम करणाऱ्या या अडथळ्यांमुळे स्थानिक उद्योगांना मोठा फटका बसतो, असे भारताचे म्हणणे आहे.
बांगलादेशाच्या व्यापार धोरणांमुळे तणाव
भारताने काही महिन्यांपूर्वी बांगलादेशातून येणाऱ्या मालाच्या ट्रान्झिट करारालाही पूर्णविराम दिला होता. बांगलादेश भारतीय तांदूळ, कापूस आणि धाग्यावर मोठा कर लावतो, ज्यामुळे प्रादेशिक विकासाला अडथळा निर्माण होतो, असा भारताचा आरोप आहे.