भारतीय लष्करात ऑपरेशन सिंदूरनंतर संघटनात्मक स्तरावर मोठे बदल घडून येत आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी आणि भविष्यातील पारंपरिक व हायब्रिड युद्धांसाठी भारतीय लष्कर आता अधिक सज्ज होत आहे. या बदलांची सुरुवात ड्रोन युनिट्स, लाइट कमांडो बटालियन, विशेष आर्टिलरी युनिट्स तसेच नव्याने स्थापन होणाऱ्या रुद्र ब्रिगेड आणि भैरव कमांडो बटालियन पासून झाली आहे.
ड्रोन आणि काऊंटर-ड्रोन युनिट्स प्रत्येक बटालियनमध्ये
भारतीय लष्करात आता प्रत्येक बटालियनमध्ये ड्रोन आणि काउंटर-ड्रोन प्रणाली ही मानक शस्त्र प्रणाली म्हणून समाविष्ट केली जाणार आहे. प्रत्येक युनिटमध्ये एक स्वतंत्र ड्रोन युनिट कार्यरत असेल, ज्यात प्रशिक्षित सैनिक फक्त ड्रोन ऑपरेट करण्याचे काम करतील. यासाठी सुमारे ७० नव्या सैनिकांची भरती होणार असून, काही कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदलही केला जाणार आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतरच्या निर्णयांचा परिणाम
या सर्व बदलांना गती मिळाली ती मे महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर. त्या ऑपरेशनमधून मिळालेल्या अनुभवांचा वापर करून लष्कर अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानाधारित बनवण्याच्या दृष्टीने हे पावले उचलण्यात येत आहेत.
‘भैरव’ – नवे कमांडो युनिट
भारतीय लष्करात ‘भैरव’ नावाने 30 नव्या कमांडो बटालियन तयार केल्या जात आहेत. प्रत्येक बटालियनमध्ये सुमारे 250 विशेष प्रशिक्षित सैनिक असतील. हे युनिट्स उच्च प्रशिक्षित आणि जलद कारवाई करणारे असतील, जे उग्रवादप्रवण क्षेत्रांपासून सीमावर्ती भागांमध्ये तात्काळ प्रतिसाद देऊ शकतील.
‘रुद्र ब्रिगेड’ – सर्व क्षेत्रातील एकात्मिक युद्ध ब्रिगेड
याच्या जोडीला ‘रुद्र ब्रिगेड’ ची स्थापना केली जाणार आहे. या ब्रिगेडमध्ये ड्रोन, शस्त्र प्रणाली, लॉजिस्टिक घटक आणि वेगवेगळ्या प्रकारचे युद्धसामग्री एकत्र असणार आहे. रुद्र ब्रिगेड ही चिलखती, पायदळ आणि तोफखाना युनिट्सच्या समन्वयातून तयार होणारी एकात्मिक शक्ती असेल. ही ब्रिगेड कोणत्याही युद्धप्रकारासाठी तत्काळ आणि स्वतंत्रपणे कृती करू शकते.
भविष्यातील युद्धांसाठी भारतीय लष्कर सज्ज
ही सर्व सुधारणा भारतीय लष्कराला स्मार्ट व टेक्नॉलॉजी-ड्रिव्हन बनवण्याच्या दिशेने उचललेली महत्वाची पावले आहेत. पारंपरिक युद्धासोबतच हायब्रिड आणि सायबर युद्धांचा धोका लक्षात घेता, भारतीय लष्कराचे हे पाऊल देशाच्या सुरक्षिततेसाठी निर्णायक ठरणार आहे.
भारतीय लष्कर आता पारंपरिक पद्धतीवर न राहता तांत्रिक, जलद आणि आधुनिक प्रणालींवर आधारित बनत आहे. ‘रुद्र’ आणि ‘भैरव’ सारख्या ब्रिगेड लष्कराच्या क्षमतेत एक नवीन अध्याय उघडत आहेत. ऑपरेशन सिंदूर ही या बदलांची नांदी ठरली आहे.