जळगावमध्ये नव्या राजकीय समीकरणांची झाली सुरुवात
जळगावमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, ठाकरेंच्या गटातील माजी महापौर आणि तब्बल 12 माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा प्रवेश मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला. या घडामोडीमुळे आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. दुसरीकडे, या घडामोडीमुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
भाजपच्या रणनितीला बळ मिळणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समीप आल्या आहेत आणि प्रत्येक पक्ष आपला मोर्चा तयार करत आहे. भाजपने एकहाती सत्ता मिळवण्यासाठी इतर पक्षांतील माजी नगरसेवकांना पक्षात घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भाजपचं संघटन आणखी मजबूत होणार असून विरोधकांसाठी हे मोठं आव्हान ठरणार आहे.
2013 ते 2018 मधील बदल
2013 मध्ये जळगाव महानगरपालिकेत खानदेश विकास आघाडीने तब्बल 33 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजपने मोठा प्रयत्न करूनही फारसा फायदा झाला नाही. मात्र, 2018 च्या निवडणुकीत भाजपने तब्बल 75 पैकी 57 जागा मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली. हे यश मिळवून देण्यात गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाची मोठी भूमिका होती. आता पुन्हा एकदा महाजन हेच या नव्या राजकीय गणिताचे सूत्रधार बनले आहेत.
महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा झाल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात जागावाटपाचं गणित गुंतागुंतीचं झालं आहे.
भाजपला जुन्या नगरसेवकांनाही जागा द्याव्या लागतील, तसेच नव्या प्रवेशकांनाही संधी द्यावी लागेल. त्यामुळे तीघांमध्ये समान जागावाटप न झाल्यास “मैत्रीपूर्व निवडणूक” होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गिरीश महाजन यांचा आत्मविश्वास आणि जनतेचा निर्णय
गिरीश महाजन यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, जळगाव महानगरपालिकेत सर्वाधिक जागा भाजपच्या खात्यात येतील. त्यांनी पुन्हा एकदा शहरात भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
तथापि, अंतिम निर्णय जळगावच्या जनतेच्या हातात आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनता कोणाला सत्तेवर बसवते आणि कोणाला खाली खेचते, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.
जळगाव महानगरपालिकेत पुन्हा एकदा राजकीय समीकरणांचा फेरबदल दिसत आहे. भाजपच्या या नव्या हालचालींमुळे महानगरपालिका निवडणूक अधिक रोचक झाली आहे. आगामी काळात महायुती टिकते की मैत्रीपूर्व निवडणूक होते, हेच ठरवेल की जळगावमध्ये भगवा पुन्हा फडकेल की नाही.