महाराष्ट्रावर मोठं संकट! पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा – IMD चा अलर्ट जाहीर
मुंबई | 25 ऑगस्ट 2025: भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मागील काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने राज्यात जोर धरला असून, पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पावसाचा जोर का वाढला?
बंगालच्या उपसागरात आणि मध्यप्रदेशात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यभर पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोणत्या भागांना ऑरेंज अलर्ट?
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज कोकण आणि मराठवाडा विभागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. खालील जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे –
- रत्नागिरी
- रायगड
- सिंधुदुर्ग
- नंदुरबार
- जळगाव
- धुळे
- नाशिक
- परभणी
- लातूर
- नांदेड
- हिंगोली
- घाटमाथा परिसर
बाकी उर्वरित महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईतील परिस्थिती
मुंबई आणि उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. वाऱ्यासह बरसणाऱ्या मुसळधार सरींमुळे रस्त्यांवर पाणी साचले असून शाळा, कार्यालये आणि वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. गणेशोत्सवाच्या आगमनाच्या तयारीदरम्यान पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे.
25 ऑगस्ट रोजी मुंबईसाठी आधीच हवामान खात्याने अलर्ट जारी केला होता आणि त्यानुसार सकाळपासूनच पावसाने जोर धरला आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
शेती आणि जनजीवनावर परिणाम
राज्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. तसेच शेती पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. नुकतेच थोडेफार विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.
पुढील 24 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेऊन नागरिकांनी सुरक्षित राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाने केले आहे.