मनोज जरांगे पाटील यांची शेतकऱ्यांसाठी 8 मोठी मागणी; महिन्याला 10 हजार पगार ते कर्जमुक्तीची हाक!

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे मोठी सभा घेतली. आजारी असूनही त्यांनी सभेला हजेरी लावली आणि शेतकऱ्यांच्या समस्या, विशेषतः अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर सरकारने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. या वेळी त्यांनी थेट सरकारकडे 8 मोठ्या मागण्या केल्या आहेत.

शेतकऱ्यांसाठी जरांगे पाटील यांची 8 मागण्या

  1. ओला दुष्काळ जाहीर करावा.
  2. शेतकऱ्यांना 70 हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी.
  3. नदीकाठची शेती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना 1 लाख 30 हजार रुपयांची मदत द्यावी.
  4. संपूर्ण कर्जमुक्ती जाहीर करावी.
  5. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरी द्यावी.
  6. शेतमालाला हमीभाव द्यावा, अन्यथा आंदोलन सुरुच राहील.
  7. शेतीला नोकरीचा दर्जा द्यावा आणि 10 एकरांच्या आत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दर महिन्याला 10 हजार रुपये पगार द्यावा.
  8. पीक विम्यातील तीन ट्रिगर हटवून शेतकऱ्यांना थेट विमा द्यावा.

जरांगे पाटील यांची चेतावणी

सभेत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “या मागण्या सरकारने दिवाळीपर्यंत पूर्ण केल्या नाहीत, तर आपण सर्व शेतकऱ्यांना धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर, जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील सीमारेषांवर एकत्र करणार. आधी बैठक घेऊ आणि त्यानंतर आंदोलन सुरू करू. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही.”

शेतकऱ्यांचा आधारस्तंभ?

राज्यातील अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा आणि आत्महत्येच्या घटनांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत जरांगे पाटील यांच्या या मागण्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरू शकतात. मात्र सरकारकडून प्रत्यक्षात कितपत पावले उचलली जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मनोज जरांगे पाटील यांच्या या 8 मागण्या शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. कर्जमाफी, हमीभाव, पगार आणि विमा अशा मागण्यांची पूर्तता झाली, तर शेतकरी वर्गाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top