मराठा क्रांती मोर्चाची मदत: आंदोलकांसाठी 5 हजार पाण्याच्या बाटल्या आणि 10 हजार भाकऱ्या मुंबईत पाठविल्या
दीपक पडकर, बारामती | 6 ऑगस्ट 2025
मुंबईत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर जनाधार मिळत आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणाऱ्या आंदोलकांसाठी आता बारामतीतील मराठा क्रांती मोर्चा पुढे सरसावला आहे. आंदोलकांना अन्न-पाण्याची कमतरता जाणवू नये यासाठी 5 हजार पाण्याच्या बाटल्या आणि 10 हजाराहून अधिक भाकऱ्या मुंबईला पाठवण्यात आल्या आहेत.
बारामतीतून उसळलेली मदतीची लाट
बारामतीतील मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी जेव्हा मुंबईत गेले, तेव्हा आंदोलकांना अन्न-पाण्याची कमतरता भासत असल्याचे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. त्यानंतर तातडीने आवाहन करण्यात आले. विशेष म्हणजे फक्त तीन तासांत बारामतीतील जिजाऊ भवनात मदतीचा ओघ जमला. हजारो भाकऱ्यांचे डबे आणि हजारो पाण्याच्या बाटल्या एकाच ठिकाणी जमा झाल्या.
या कामात महिलांचा मोठा सहभाग होता. संध्याकाळी सहा वाजल्यापासून महिला एकत्र येऊन भाकऱ्यांचे डबे बांधण्याचे काम करत होत्या. ही मदत फक्त एक दिवसापुरती नसून, जोपर्यंत आंदोलन सुरू आहे तोपर्यंत बारामतीतून मुंबईकडे मदत पाठवली जाणार आहे, असे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मराठा बांधवांचा सहभाग
बारामती शहरापुरतेच नव्हे, तर आसपासच्या 20 ते 30 किलोमीटर परिसरातून मराठा बांधव मदतीसाठी पुढे सरसावले. शेकडो लोक आपल्या परीने भाकरीचे डबे घेऊन मदत ठिकाणी पोहोचले. यामुळे मराठा समाजाच्या एकतेचे चित्र राज्यभर दिसून येत आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि इशारा
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला दिवसेंदिवस मोठी गर्दी मिळत आहे. जर सरकारने तातडीने आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेतला नाही, तर आगामी शनिवार-रविवारी राज्यभरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
पहिल्या दिवशी आंदोलकांना अडचणींना सामोरे जावे लागले होते. आझाद मैदान परिसरातील खाऊ गल्ली बंद असल्याने आंदोलक उपाशी राहिले. मात्र आता राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. या मदतीमुळे आंदोलन अधिक बळकट होत असून, मराठा बांधव एकदिलाने जरांगे पाटील यांच्या मागे उभे राहिल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाला राज्यातील सर्व भागांतून पाठिंबा मिळत आहे. बारामतीतून आलेली पाण्याच्या बाटल्या आणि भाकऱ्यांची मदत यामुळे आंदोलकांना आधार मिळत आहे. एकतेच्या या लाटेमुळे सरकारवर दडपण वाढत असून, पुढील काही दिवसांत या आंदोलनाचा कौल काय लागतो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.