म्हाडा कोकण मंडळाकडून पाच हजार घरांसाठी बंपर लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. या लॉटरीसाठी आजपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. म्हाडा कोकण मंडळाने घरांच्या आणि भूखंडांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी एक सुवर्णसंधी दिली आहे. कोकण विभागातून 5285 घरं आणि 77 भूखंड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही सोडत 2025 मधील एक मोठा उपक्रम ठरणार आहे. इच्छुक नागरिकांनी वेळेत अर्ज करण्याची तयारी ठेवावी.
कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही सोडत एकूण पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे.
1. 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत – 565 सदनिका
2. 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत – 3,002 सदनिका
3. म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना (व विखुरलेल्या सदनिका) – सद्यस्थितीत उपलब्ध अशा 1,677 सदनिका
4. म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना (50 टक्के परवडणाऱ्या सदनिका) – 41 सदनिका
5. म्हाडा कोकण मंडळ अंतर्गत भूखंड विक्री – 77 भूखंड
या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 13 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. अर्जदार 14 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अनामत रक्कम ऑनलाईन भरू शकतील. सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्ज या प्रणालीद्वारे तपासले जातील आणि पात्र अर्जांची प्रारूप यादी 21 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://housing.mhada.gov.in प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादीवरील दावे व हरकती नोंदविण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर, सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी 1 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
अर्जासाठी लागणारी कागदपत्रं:
- आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- PAN कार्ड
- बँक पासबुक/स्टेटमेंट
- रहिवासी पुरावा
अर्जदारांच्या सोयीसाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://housing.mhada.gov.in अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवीन संगणकीय प्रणालीचा वापर सोपा व्हावा यासाठी मार्गदर्शक माहितीपुस्तिका, ध्वनीचित्रफीत, हेल्प फाईल आणि हेल्प साईट याच संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सोडत प्रक्रियेत सहभागी होण्यापूर्वी अर्जदारांनी ही मार्गदर्शक माहिती काळजीपूर्वक वाचावी, असे आवाहन कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी केले आहे.