राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिकच उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, स्वत: जयंत पाटील यांनीही नुकतीच एक मोठी राजकीय हालचाल केली आहे – त्यांनी ‘जर मी भाजपमध्ये गेलो तर काय?’ यावर अंतर्गत सर्व्हे करून घेतला असून, या सर्व्हेचा अहवालही त्यांच्या हाती आला आहे. या पार्श्वभूमीवर, त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही महत्त्वाची बैठक घेतल्याची माहिती पुढे आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय भूकंपानंतर, जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागले, ज्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चां होत आहेत. जयंत पाटील हे शरद पवार गटातील एक महत्त्वाचे आणि ज्येष्ठ नेते मानले जातात. मात्र राष्ट्रवादीत झालेल्या फाटल्यानंतर त्यांचा राजकीय पुढचा निर्णय काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता त्यांच्याच पातळीवरून भाजपमध्ये जाण्याबाबत गंभीर विचार सुरू झाल्याचे समजते. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारसंघातील लोकांमध्ये ‘भाजपमध्ये गेल्यास काय परिणाम होतील?’ याचा अंदाज घेण्यासाठी त्यांनी गुप्त सर्वेक्षण केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयंत पाटलांनी एका खासगी एजन्सीमार्फत सर्व्हे केला असून, यामध्ये त्यांचा इमेज, भाजपमध्ये गेल्यास होणारा राजकीय फायदा-तोटा, कार्यकर्त्यांचा प्रतिसाद, मतदारांची भावना यांचा अभ्यास करण्यात आला आहे. अहवालात सांगितले आहे की, भाजपमध्ये गेल्यास त्यांना नवीन राजकीय संधी मिळू शकतात. मात्र, पारंपरिक मतदारांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे.
मस्साजोगपासून मराठी भाषेच्या मुद्द्यापर्यंत त्यांनी बाळगलेलं मौन लक्षवेधी आहे. विधानसभेत त्यांनी कधीही सरकारची कोंडी केलेली नाही. त्यामुळे ते भाजपमध्ये जातील अशी अटकळ आहे. या सर्व्हेतून समोर आलेला तपशील पाटलांसाठी सकारात्मक आहे. पाटील प्रदिर्घकाळ सत्तेत राहिले आहेत. त्यांचे पुत्र प्रतीक पाटील अद्याप राजकारणात स्थिरस्थावर झालेले नाहीत. पक्षांतर केल्यास, भाजपमध्ये गेल्यास भविष्य उज्ज्वल असेल, असं सर्व्हे सांगतो. त्यामुळे पाटील भाजप प्रवेशाबद्दल सकारात्मक असल्याचं समजतं.