पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणखी एक बायोपिक जाहीर; उन्नी मुकुंदन साकारणार मोदींची भूमिका!

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणखी एक बायोपिक जाहीर; उन्नी मुकुंदन साकारणार मोदींची भूमिका!
मुंबई | 17 सप्टेंबर 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त चित्रपटसृष्टीतून मोठी घोषणा करण्यात आली आहे. सिल्व्हर कास्ट क्रिएशन्स या प्रॉडक्शन हाऊसने ‘माँ वंदे’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली असून, हा चित्रपट नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित असेल.

या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता उन्नी मुकुंदन साकारणार आहे. निर्मितीची जबाबदारी वीर रेड्डी एम यांनी स्वीकारली आहे तर दिग्दर्शनाची धुरा क्रांती कुमार सांभाळणार आहेत.

चित्रपटाची कथा

हा चित्रपट नरेंद्र मोदी यांच्या बालपणापासून सुरू होऊन, देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंतच्या प्रवासावर आधारित असेल. विशेष म्हणजे, मोदी आणि त्यांची आई हिराबेन मोदी यांच्यातील नातेसंबंधाचं चित्रण या सिनेमात खास करून दाखवलं जाणार आहे. चित्रपट हिंदीसोबतच इंग्रजीमध्येही प्रदर्शित होणार असल्याने तो आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल.

उन्नी मुकुंदन कोण आहेत?

उन्नी मुकुंदन यांचा जन्म केरळमधील त्रिशूर येथे झाला, मात्र त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्ष गुजरातमध्ये घालवली आहेत. अहमदाबादमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या उन्नींनी 2011 मध्ये तमिळ चित्रपट ‘सीदन’ मधून इंडस्ट्रीत पदार्पण केलं.

यानंतर मल्लू सिंग, विक्रमादित्यन, केएल 10 पट्टू, स्टाईल, आचायन्स, मलिकप्पुरम आणि मार्को अशा यशस्वी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. तेलुगू सुपरहिट चित्रपट ‘जनता गॅरेज’ तसेच तमिळ चित्रपट ‘गरूडन’ मध्येही उन्नी झळकले आहेत.

मोदींचा 75 वा वाढदिवस

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 75 वर्षांचे झाले. देशभरातून तसेच चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी त्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता अनुपम खेर यांनी संदेश देताना लिहिले की, “आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी! तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अनेक शुभेच्छा! देव तुम्हाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य देवो. येणाऱ्या अनेक वर्षांत तुम्ही अशाच दृढनिश्चयानं आणि निस्वार्थतेनं देशाचं नेतृत्व करत राहा.”

‘माँ वंदे’ हा चित्रपट नरेंद्र मोदींच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनाची कथा मोठ्या पडद्यावर आणणार आहे. मोदींचा प्रवास, त्यांचा दृढनिश्चय आणि आईबरोबरचं नातं यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top