टेलिव्हिजन विश्वातील एक प्रसिद्ध चेहरा असलेल्या पूजा बॅनर्जी सध्या आर्थिक अडचणीत सापडली आहे. अनेक हिट मालिका गाजवणारी ही अभिनेत्री आज मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठीही संघर्ष करत आहे. तिचा पती आणि अभिनेता कुणाल वर्मा यांच्यासह ती एक गंभीर वादात अडकली आहे. या जोडप्याविरुद्ध निर्माते श्याम सुंदर डे यांनी अपहरण, फसवणूक आणि खंडणी यासारख्या गंभीर आरोपांसह एफआयआर दाखल केली आहे.
वादाच्या भोवऱ्यात अभिनेत्रीचं आयुष्य
अलीकडेच या दोघांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, श्याम सुंदर डे आमचे पैसे घेऊन गायब झाले, आणि जेव्हा आम्ही ते मागायला गेलो तेव्हा त्यांनी उलट आमच्यावरच अपहरणाचे आरोप केले. पूजा बॅनर्जीने सांगितले की, पोलीस तपास करत आहेत आणि आमच्याकडे पुरावे असल्याने आम्हाला लगेच सोडून देण्यात आले.
कुणाल वर्मानेही आपली खंत व्यक्त करत सांगितले, “मला आफ्रिका, लंडन आणि पाकिस्तानमधून फोन आणि धमक्या येत आहेत. मी आणि पूजा दोघेही मानसिकदृष्ट्या खूप थकलो आहोत. खिशात पैसे नसताना जगण्यातला संघर्ष खूप मोठा असतो.”
आर्थिक संकटाने कुटुंबाला घेरलं
कुणालने खळबळजनक खुलासा केला की, मुलाच्या शाळेची फीही त्याच्या मामाने भरली, कारण सध्या त्यांच्या जवळ पैसाच नाही. “आज माझ्या मुलाने काही मागितले, तरी मी देऊ शकत नाही. मला अनेक कर्जं फेडायची आहेत. माझ्याकडे जे काही सोनं होतं, ते देखील आज बँकेत ठेवून पैसे उभे केले आहेत. मला शूटिंगमधूनही वगळण्यात आलं आहे.”
कामाची संधीही हिरावली

या वादाचा थेट परिणाम त्यांच्या करिअरवर झाला आहे. पूजा बॅनर्जी ही ‘देवों के देव महादेव’ या लोकप्रिय मालिकेत पार्वतीची भूमिका साकारून घराघरात पोहोचली होती. तिने अनेक हिंदी मालिकांमध्ये लक्षवेधी भूमिका केल्या. पण सध्या वादामुळे तिच्यावर कामाचे दरवाजे बंद होत आहेत.
कुणाल म्हणतो, “जेव्हा अडचणी येतात तेव्हा कोण खरा आणि कोण खोटा हे समजतं. सध्या फार कमी लोक आमच्यासोबत उभे आहेत.”
चाहत्यांनी दिला आधार
या कठीण प्रसंगी पूजा आणि कुणालला त्यांच्या चाहत्यांकडून मोठा आधार मिळतो आहे. सोशल मीडियावर दोघांना पाठिंबा देणारे हजारो कमेंट्स आणि मेसेजेस येत आहेत. चाहत्यांनी त्यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.