सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हे शाखेची जलद कारवाई; तीन आरोपी अटकेत, तीन अल्पवयीन ताब्यात
पुणे शहरात भरदिवसा घडलेल्या धाडसी दरोड्याने खळबळ उडवून दिली होती. पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी परिसरात असलेल्या एका सराफी पेढीत कोयत्याचा धाक दाखवून सुमारे ५२ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लुटण्यात आले होते. मात्र, या गंभीर गुन्ह्याचा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावला आहे.या प्रकरणात प्रवीण महादेव शिंदे (१८), राजदीप संतोष जगताप (२१) आणि भावेश राजेश चव्हाण (२०) यांना अटक करण्यात आली असून, तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपींकडून २२४ ग्रॅम सोन्याचे व १८३ ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.तपासात उघड झाले की, आरोपींनी दरोड्यापूर्वी सराफी पेढी व परिसराची पाहणी केली होती. शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सराफ व्यावसायिक एकटे असताना आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून दागिने लुटले आणि घटनास्थळावरून पलायन केले.घटनेनंतर मांजरी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकांसह विविध युनिट्सनी समांतर तपास हाती घेतला.
सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी छत्रपती संभाजीनगरकडे पसार झाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर कारवाई करत काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.उर्वरित आरोपींना पुणे-सोलापूर रस्त्यावरील द्राक्ष संशोधन केंद्र परिसरात सापळा रचून अटक करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, संबंधित पोलिस पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.