पुण्यात गँगवॉर! आंदेकर विरुद्ध कोमकर संघर्ष पुन्हा पेटला; रक्तरंजित इतिहास उघड!

पुण्यात गँगवॉर! आंदेकर विरुद्ध कोमकर संघर्ष पुन्हा पेटला; रक्तरंजित इतिहास उघड!

पुण्यात गँगवॉर! आंदेकर विरुद्ध कोमकर संघर्ष पुन्हा पेटला; रक्तरंजित इतिहास उघड

पुणे | 5 सप्टेंबर 2025 | प्रतिनिधी अभिजीत दराडे

पुण्यात पुन्हा एकदा गँगवॉरचा रक्तरंजित अध्याय उघड झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येला अवघे एक वर्ष पूर्ण होताच, या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याच्या मुलाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. गोविंद कोमकर असे या तरुणाचे नाव असून, ही घटना नाना पेठेत रात्री साडेआठ वाजता घडली. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोविंदवर थेट तीन गोळ्या झाडल्या आणि तो जागीच मृत झाला.

या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुण्यातील आंदेकर–कोमकर वादाचा इतिहास पुन्हा चर्चेत आला आहे.

कसा पेटला आंदेकर–कोमकर वाद?

एकेकाळी दोन्ही कुटुंबांमध्ये घनिष्ठ संबंध होते. आंदेकर कुटुंबातील मुलगी कोमकर कुटुंबात विवाह करून दिली होती. याशिवाय कोमकर कुटुंबाला घर व दुकान सांभाळायला देण्यात आले होते. मात्र, पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाईत हे दुकान पाडण्यात आले. या रागातूनच घरगुती वाद अधिक तीव्र झाला आणि वनराज आंदेकर यांचा खून करण्यात आला.

वनराज आंदेकर हत्या प्रकरण

2023 मध्ये झालेल्या घटनाक्रमानुसार, बंडू आंदेकर गट आणि सोमनाथ गायकवाड टोळी यांच्यात आधीपासूनच वैर होते. आंदेकर गटाने शुभम दहिभाते आणि निखील आखाडेवर हल्ला केला होता, त्यात निखीलचा मृत्यू झाला. त्यानंतर गायकवाड टोळी बदला घेण्याच्या तयारीत होती.

याच संधीचा फायदा घेत गणेश कोमकरने सोमनाथ गायकवाडला वनराज आंदेकरच्या हत्येची सुपारी दिली. परिणामी, पुण्यात धक्कादायक खून झाला.

बंडू आंदेकर गटाचा जुना इतिहास

बंडू आंदेकरची टोळी 90 च्या दशकात कुप्रसिद्ध होती. त्यावेळी आंदेकर गट आणि माळवदकर गटामध्ये मोठं गँगवॉर झालं होतं. यात प्रमोद माळवदकरचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी बंडू आंदेकरला जन्मठेपेची शिक्षा झाली होती, मात्र तो शिक्षा भोगून नंतर बाहेर आला.

राजकीय पार्श्वभूमी

आंदेकर कुटुंबाला राजकीय पाठींबाही मोठा आहे.

  • वनराज आंदेकर : 2017 ते 2022 पर्यंत पुणे मनपाचे नगरसेवक.
  • राजश्री आंदेकर (आई): 2007 आणि 2012 मध्ये सलग दोन कार्यकाळ नगरसेविका.
  • उदयकांत आंदेकर (चुलते): नगरसेवक पद भूषवले.

या पार्श्वभूमीवर आंदेकर–कोमकर संघर्ष फक्त वैयक्तिक न राहता, संपत्ती, राजकारण आणि टोळीयुद्धाचा संगम झाला आहे.

गोविंद कोमकरच्या हत्येमुळे आंदेकर–कोमकर संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही टोळ्यांचे समर्थक संतप्त झाले असून, पोलिसांनी नाना पेठ परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने पोलिसांना मोठे आव्हान उभे राहिले आहे.

पुण्यातील आंदेकर–कोमकर संघर्ष हा केवळ दोन कुटुंबातील वाद नसून, त्यात राजकारण, संपत्ती, आणि टोळीयुद्धाचा गुंता आहे. एका हत्येचा बदला म्हणून दुसरी हत्या होणे ही चिंताजनक बाब आहे. कायदा-सुव्यवस्थेसाठी ही मोठी कसोटी आहे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *