अखेर पुण्याचा नवा महापौर ठरला! भाजपच्या रणनीतीतून मंजुषा नागपुरेंच्या नावावर शिक्कामोर्तब!

पुणे महापौरपदासाठी भाजपच्या कोअर कमिटीतील चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम निर्णय घेत अनुभवी नगरसेविका मंजुषा नागपुरे यांना संधी दिली आहे.

पुण्याच्या महापौरपदाचा तिढा सुटला

पुणे महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर तब्बल दोन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पुण्याच्या महापौरपदावर कोण विराजमान होणार, याचा निर्णय स्पष्ट झाला आहे. भारतीय जनता पक्षाकडून पुण्याच्या महापौरपदासाठी मंजुषा नागपुरे यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला मान्यता दिली असून भाजपच्या राजकीय वर्तुळात याची अधिकृत घोषणा झाली आहे.

भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक

सोमवारी पुण्यात भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत पुणे महापालिकेतील महापौरपदासाठी तीन नावांची शिफारस करण्यात आली होती.या यादीत वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे आणि मानसी देशपांडे यांचा समावेश होता. तिन्ही नगरसेविका अनुभवी असून त्या चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत.

मुख्यमंत्री फडणवीसांचा अंतिम निर्णय

कोअर कमिटीच्या शिफारशीनंतर अंतिम निर्णयासाठी विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आला होता. सुरुवातीला वर्षा तापकीर यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जात होते. मात्र राजकीय समीकरणे, अनुभव आणि प्रशासनातील कामगिरी लक्षात घेता अखेर मंजुषा नागपुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले

.बिनविरोध निवडीची शक्यता.

महानगरपालिकेत सध्या भाजपकडे स्पष्ट संख्याबळ असल्यामुळे महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवड बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे पुरेसं संख्याबळ नसल्याने त्यांनी महापौरपदासाठी उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.यामुळे पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.

उपमहापौरपद आरपीआयकडे

भाजपच्या मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांना उपमहापौरपद देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरपीआयकडून परशुराम वाडेकर यांचे नाव उपमहापौरपदासाठी पुढे आले आहे. 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत आवाजी मतदानाद्वारे ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

कोण आहेत मंजुषा नागपुरे?

मंजुषा नागपुरे या पुणे महापालिकेतील एक अनुभवी आणि अभ्यासू नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. ही त्यांची नगरसेवक म्हणून चौथी टर्म असून त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत.त्यांच्या निवडीमुळे सिंहगड रोड परिसराला प्रथमच महापौरपद मिळणार आहे, ही बाब त्या भागासाठी ऐतिहासिक मानली जात आहे.

प्रशासनाचा मोठा अनुभव

महापालिकेतील विविध समित्यांवर काम केल्याचा मोठा अनुभव मंजुषा नागपुरे यांच्याकडे आहे. नागरी समस्या, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण आणि स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर त्या सातत्याने सक्रिय राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भाजपच्या धक्कातंत्राची चर्चा

महापौरपदाच्या निवडीत भाजपने अखेरच्या क्षणी निर्णय बदलत मंजुषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे राजकीय वर्तुळात ‘भाजपचं धक्कातंत्र’ अशी चर्चा रंगली आहे. मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय अनुभव आणि कामगिरीच्या आधारावर घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

पुण्याच्या विकासाकडे लक्ष

नव्या महापौरांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरात वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता, स्मार्ट सिटी प्रकल्प आणि नागरी सुविधांवर भर दिला जाणार असल्याची अपेक्षा आहे. पुणेकरांच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची ठरणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top