पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्तेत एकत्र असलेले भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हे दोन्ही पक्ष आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकलेले दिसत आहेत. प्रचाराला अद्याप सुरुवातही पूर्णपणे झालेली नसताना आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
भाजपकडून “सव्वाशे पार” असा आत्मविश्वासपूर्ण नारा देण्यात आला आहे. भाजपचे आमदार व पिंपरी-चिंचवड निवडणूक प्रचार प्रमुख शंकर जगताप यांनी भाजप १२५ पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा दावा केला आहे. तसेच पक्षात बंडखोरी होणार नाही आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य संधी दिली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याच पार्श्वभूमीवर भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
मात्र भाजपच्या या दाव्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आक्रमक झाली असून थेट ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल यांनी भाजपवर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. “भाजप ईव्हीएम सेट केल्याशिवाय सव्वाशे पार करू शकणार नाही,” असा थेट दावा त्यांनी केला आहे.
योगेश बहल म्हणाले की, भाजपला १२५ जागा तर सोडाच, १०० जागाही मिळवणं अवघड जाईल. त्यांनी उघड आव्हान देत सांगितलं की, “भाजपने जर १२५ जागा जिंकल्या, तर मी कायमचं राजकारण सोडेन.” हा दावा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे निवडणुकीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असल्याचं चित्र आहे.
इतकंच नाही तर भाजपवर फोडाफोडीचं राजकारण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. भाजपमध्ये जाणाऱ्या लोकांना “मशिनमधून आपोआप दोन ते अडीच हजार मते मिळतील” असा विश्वास दिला जात असल्याचा धक्कादायक दावा योगेश बहल यांनी केला. त्यांनी असंही सांगितलं की, ज्यांना स्वतःवर आणि जनतेवर विश्वास नाही, असेच लोक भाजपमध्ये जात आहेत.
अजित पवार यांचं नेतृत्व महाराष्ट्रात भक्कम असून अशा नेत्याला सोडून जाणाऱ्यांना जनता योग्य उत्तर देईल, असा विश्वासही बहल यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता येईल, असा ठाम दावा त्यांनी केला आहे. या सगळ्या आरोपांमुळे निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यांवर नाही तर विश्वास, ईव्हीएम आणि नैतिकतेवरही लढली जाणार असल्याचं स्पष्ट होत आहे.
एकूणच पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अशी थेट आणि तीव्र लढत पाहायला मिळणार आहे. आरोप-प्रत्यारोप, आव्हानं आणि संशय यामुळे पुणे जिल्ह्यातील राजकारण दिवसेंदिवस अधिकच तापत चाललं आहे. आता अंतिम निकालात जनता कोणाच्या बाजूने कौल देते, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.