पुतिन यांचा ट्रम्पना इशारा: अण्वस्त्र करार एक वर्ष वाढणार, नियम मोडल्यास रशियाचा कठोर इशारा
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेसोबतच्या ‘न्यू स्टार्ट’ अण्वस्त्र कराराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी या कराराचे पालन आणखी एक वर्ष वाढवण्याची तयारी दर्शवली, मात्र त्यासोबतच अमेरिकेला कठोर इशाराही दिला आहे.
न्यू स्टार्ट करार काय आहे?
‘न्यू स्टार्ट’ हा अमेरिका आणि रशिया यांच्यातील शेवटचा अण्वस्त्र नियंत्रण करार आहे. या कराराद्वारे दोन्ही देशांवर जमिनीवरून व पाणबुडीतून सोडल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांवर, तसेच बॉम्बवर्षक विमानांच्या संख्येवर मर्यादा ठरवण्यात आल्या आहेत. पुतिन यांनी स्पष्ट केले की, 5 फेब्रुवारी 2026 नंतर रशिया अजून एक वर्ष या कराराचे पालन करेल – पण तेव्हाच, जेव्हा अमेरिका देखील कराराच्या अटींचे काटेकोरपणे पालन करेल.
पुतिन यांचा इशारा
रशियाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत पुतिन म्हणाले,
“जर अमेरिकेने कराराचे नियम तोडले किंवा संतुलन बिघडवणारे पाऊल उचलले, तर रशियाला आपला निर्णय बदलावा लागेल.”
त्यांनी स्पष्ट केले की हा निर्णय परस्पर विश्वासावर आधारित आहे, आणि अमेरिका नियमभंग केल्यास कराराची वैधता धोक्यात येऊ शकते.
चीनशी कनेक्शन
या कराराबाबत अमेरिका आणि रशिया यांच्यात सध्या कोणतीही औपचारिक चर्चा सुरू नाही. रशिया-युक्रेन युद्धामुळे संबंध ताणलेले असतानाच, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनलाही या करारात सामील करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पुतिन यांनी सांगितले की, रशियाकडून घेतलेला हा एक वर्षाचा विस्तार हा जागतिक अण्वस्त्र प्रसार थांबवण्याचा आणि अमेरिकेशी संवाद वाढवण्याचा प्रयत्न आहे.
रशियाने केलेल्या या निर्णयामुळे अण्वस्त्र नियंत्रण कराराच्या भविष्यासंदर्भात जगभरात चर्चेला उधाण आले आहे. पुतिन यांनी दिलेला इशारा अमेरिकेसाठी एक स्पष्ट संदेश आहे की, कराराचे पालन न झाल्यास जागतिक सुरक्षा धोक्यात येऊ शकते.