लखनऊ | 21 ऑगस्ट 2025
भारतीय स्टेट बँकेच्या गृहकर्ज शाखेतील वरिष्ठ लिपिक सुरेंद्र पाल सिंह (वय 40) हे अचानक बेपत्ता झाल्यानं लखनऊसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी एक पत्र लिहून कार्यालयातील महाव्यवस्थापक विक्रम कुमार धेजा यांच्याकडून होणाऱ्या मानसिक छळ, शिवीगाळ आणि अपमानाबद्दल गंभीर आरोप केले आहेत.
पत्रात नेमकं काय लिहिलं?
18 ऑगस्ट रोजी लिहिलेल्या या पत्रात सुरेंद्र पाल सिंह यांनी आपल्या रोजच्या वेदना स्पष्ट केल्या आहेत. “आता मी आणखी अपशब्द आणि शिवीगाळ सहन करू शकत नाही. दररोजच्या अपमानाला वैतागलो आहे,” असे त्यांनी नमूद केले आहे. विक्रम कुमार धेजा हे बँकेतील कर्मचारी आणि ग्राहकांसमोर सतत अपमान करतात, बदली करण्याच्या धमक्या देतात, तसेच खोटे आरोप लावतात, असे गंभीर दावे पत्रात केले आहेत.
याशिवाय त्यांनी स्पष्ट केले की, “मी आधीच उच्च रक्तदाब, स्लिप डिस्क आणि अस्वस्थतेसारख्या आजारांनी त्रस्त आहे. त्यात वेतन रोखण्याच्या धमक्या दिल्या जातात. माझी सहनशक्ती आता संपली आहे. मला काही झाल्यास त्याची जबाबदारी AGS विक्रम कुमार धेजा यांच्यावरच असेल.”
बेपत्ता होण्यापूर्वीची घटना
सुरेंद्र पाल सिंह यांनी हे पत्र आपल्या भाच्याच्या हातात देत सांगितलं की, “मी औषध आणायला जातोय.” मात्र त्यानंतर ते परत आलेच नाहीत. दोन दिवसांपासून त्यांचा कोणताही पत्ता लागलेला नाही. त्यांच्या बेपत्ता झाल्यानं कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
कुटुंबीयांची तक्रार आणि पोलिसांत धाव
सुरेंद्र पाल यांच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार नोंदवली असून, त्यांनी थेट पोलिस आयुक्त दीपक कुमार यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरण मांडलं आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं आहे की, ते कुठे दिसल्यास त्वरित पोलीस किंवा कुटुंबीयांशी संपर्क साधावा.
मूळ गाव व कुटुंब
सुरेंद्र पाल सिंह हे मूळचे सेमरी गाव (देवरी रोड भाग) येथील रहिवासी आहेत. त्यांचे धाकटे बंधू मनोज पाल सिंह हे गुजरातमधील एका बँकेत कार्यरत आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
कामाच्या ठिकाणी मानसिक छळाचा मुद्दा ऐरणीवर
या घटनेमुळे पुन्हा एकदा बँक कर्मचाऱ्यांच्या मानसिक छळाचा मुद्दा चर्चेत आला आहे. कार्यालयीन तणाव, दबाव, अपमानास्पद वागणूक यामुळे अनेक कर्मचारी त्रस्त होत असल्याचे उदाहरण सुरेंद्र पाल यांच्या प्रकरणातून समोर आले आहे. कुटुंबीय आणि कर्मचारी संघटनांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी होत आहे.
सुरेंद्र पाल सिंह यांचा दोन दिवसांपासून काहीच पत्ता लागलेला नाही. या घटनेमुळे संपूर्ण बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मानसिक छळ, अपमान आणि तणावामुळे एका कर्मचाऱ्याला आपले आयुष्य धोक्यात घालावे लागले, हे चिंताजनक आहे. पोलिसांकडून तपास वेगाने सुरू असून, त्यांच्या सुरक्षिततेबाबत सर्वजण प्रार्थना करत आहेत.