श्रावण महिना अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा पवित्र महिना भगवान शंकराला अर्पण केलेला असून, त्यात महादेवाची विशेष पूजा, व्रत आणि उपासना केली जाते. या काळात बेलपत्राचे महत्त्व अतुलनीय आहे. कारण शंकराच्या पूजेत बेलपत्राशिवाय पूजा पूर्ण मानली जात नाही.
पौराणिक मान्यतेनुसार, बेलाचे पान म्हणजे शंकराची सर्वात आवडती वस्तू. बेलपत्र अर्पण केल्याने भोलेनाथ त्वरित प्रसन्न होतात असे शास्त्र सांगते. म्हणूनच अनेक भक्त आपल्या घरात बेलाचे झाड लावतात, जेणेकरून नेहमी पूजेसाठी ताजे बेलपत्र सहज मिळू शकेल. वास्तुशास्त्रानुसार, कोणतेही पवित्र झाड घरात लावताना दिशेचा विचार अत्यंत महत्त्वाचा असतो. चुकीच्या दिशेला झाड लावल्यास सकारात्मक ऊर्जेऐवजी नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बेलपत्र लावताना योग्य दिशेची निवड केली पाहिजे.
बेलपत्र कोणत्या दिशेला लावावे?
बेलपत्राचे झाड ईशान्य दिशेला (उत्तर-पूर्व) लावणे सर्वाधिक शुभ मानले जाते. ही दिशा वास्तूमध्ये पवित्र आणि शक्तिप्रद मानली गेली आहे. याच दिशेला आपण पूजेची जागा देखील ठेवतो. त्यामुळे याच ठिकाणी बेलाचे झाड लावल्यास घरात शांतता, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहते.
जर ईशान्य दिशा शक्य नसेल, तर झाड उत्तर किंवा पूर्व दिशेला लावले तरी चालते. पण दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावणे टाळावे, कारण यामुळे लाभाऐवजी हानी होण्याची शक्यता असते.
बेलपत्र लावण्याचे फायदे
- भगवान शंकराची कृपा घरावर राहते
- मानसिक शांतता आणि सौख्य अनुभवास येते
- घरात सकारात्मक ऊर्जा आणि धार्मिक वातावरण निर्माण होते
- आर्थिक स्थितीत सुधारणा होते, तिजोरी भरून राहते
- अडचणी, संकटे दूर होतात आणि आरोग्य सुधारते.
श्रावण महिना म्हणजे भक्तीचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा काळ. या महिन्यात आपण केलेली पूजा, व्रते आणि नियम मनोभावे पाळल्यास महादेवाची कृपा निश्चित मिळते. त्यामुळे घराच्या योग्य दिशेला बेलपत्राचे झाड लावून या पवित्र महिन्यात तुमचे जीवन आध्यात्मिक आणि आर्थिक समृद्धीने भरून टाका.