कणकवली – हरकुळ बुद्रुक आणि भिरवंडे गावांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याच्या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. ग्राहकांची पूर्वपरवानगी न घेता चालू मीटर काढून त्याठिकाणी अदानी कंपनीचे स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे वीजबिलात अचानक वाढ झाल्याची तक्रारही अनेकांनी नोंदवली आहे.
या पार्श्वभूमीवर माजी आमदार वैभव नाईक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत व स्थानिक पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात धडक देत अधिकार्यांना जाब विचारला.
विना परवानगी स्मार्ट मीटर बसवले जात आहेत
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, फॉल्टी मीटरच्या नावाखाली कार्यरत मीटर देखील बदलले जात असून ग्राहकांना याबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही. महावितरणचे काही अधिकारी वायरमनना महिन्याला किमान 10 स्मार्ट मीटर बसविण्यास सांगत असून, अदानी कंपनी प्रति मीटर ₹70 देत असल्याचे एका वायरमनने कबूल केले आहे.
वीजबिलात पाचपट वाढ; ग्राहक हवालदिल
स्मार्ट मीटर बसवल्यानंतर काही ग्राहकांचे वीजबिल ₹700–₹800 वरून थेट ₹3500 पर्यंत गेले आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गरीब कुटुंबांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. अधिकाऱ्यांनी सरासरी युनिट नुसार बिल तयार केल्याचे सांगितले, परंतु शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तफावत दाखवताच ते सारवासारव करू लागले.
‘स्मार्ट मीटर आता सिस्टीममध्ये लॉक’; बदल शक्य नाही
महावितरणचे कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांनी स्पष्ट केले की एकदा बसवलेले स्मार्ट मीटर सिस्टीममध्ये लॉक झाले असून, ते बदलता येणार नाहीत. नवीन मीटर सिस्टीम स्वीकारणार नाही. यामुळे आता ग्राहकांना बिलाच्या अचूकतेवरच अवलंबून राहावे लागणार आहे.
झाडांची ट्रिकटिंग, जीर्ण पोल बदलाची मागणी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हरकुळ बुद्रुक व भिरवंडे येथील वीज वाहिन्यांवरील झाडांची ट्रिकटिंग आणि जीर्ण पोल बदलण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली. यामुळे वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेपासून दिलासा मिळू शकेल.
सामाजिक आणि राजकीय उपस्थिती
या आंदोलनात तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत, सरपंच बंडू ठाकूर, माजी सदस्य मंगेश सावंत, बेनी डिसोजा, अमित सावंत, मुकेश सावंत, नित्यानंद चिंदरकर, रिया म्हाडेश्वर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामीण भागात तांत्रिक प्रगतीच्या नावाखाली ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याच्या पद्धतीवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. महावितरणने ग्राहकांच्या विश्वासाला तडे जाऊ न देता पारदर्शक कार्यपद्धती अवलंबण्याची गरज निर्माण झाली आहे.