दौंड तालुक्यातील सोनवडी गावाने एक ऐतिहासिक क्षण अनुभवला आहे. संपूर्ण गावाचे लक्ष लागलेल्या व बराच काळ चर्चेत असलेल्या रेशन धान्य दुकानाच्या परवाना प्रकरणात, पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. महेश सुधळकर यांनी अखेर निर्णय दिला असून हा परवाना गावातील “येसूबाई स्वयंसहायता महिला समूह, सोनवडी” यांना मंजूर करण्यात आला आहे.

या प्रकरणी, यशवंत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, सोनवडी यांनी देखील परवाना मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र शासनाने महिलांच्या हक्काला प्राधान्य देत आणि सर्व नियम व अटींचे पालन करून हा ऐतिहासिक आदेश महिलांच्या बचत गटाच्या बाजूने दिला.
महत्वाची बाब म्हणजे या निर्णय प्रक्रियेत पुणे जिल्हा पुरवठा कार्यालयाबरोबरच मंत्रालय, मुंबई यांचेही मार्गदर्शन घेतले गेले. यामुळे सोनवडी गावातील महिलांना सबलीकरणाचा वाव मिळाला असून हा निर्णय गावाच्या सामाजिक इतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
या यशस्वी निकालासाठी महत्वाची भूमिका बजावलेले माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमोल संजय पवार, तसेच सोसायटीचे माजी उपचेअरमन गणेश रामचंद्र कडु आणि या दोघांच्या मित्र परिवारानी सातत्याने जिल्हा पुरवठा कार्यालय, तालुका पुरवठा कार्यालय दौंड आणि मंत्रालय मुंबई येथे पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि चिकाटीमुळे अखेर सोनवडी गावच्या लाडक्या बहिणींच्या स्वयंसहायता बचत गटाच्या नावावर हा परवाना मिळवण्यात यश आले.
हा निर्णय फक्त रेशन धान्य दुकान परवाना मंजुरीपुरता मर्यादित नसून, गावातील महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि हक्कांचा विजय आहे. यामुळे भविष्यात सोनवडी गावातील आणि दौंड तालुक्यातील इतर गावांमधील देखील महिला बचत गटांचा आत्मविश्वास अधिक वाढेल, तसेच संपूर्ण तालुक्यासाठी हा एक प्रेरणादायी आदर्श ठरेल.
पुणे जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या निर्णयाची प्रत:-

