मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरहिट चित्रपट सैराट आठवला की, आर्ची-परश्या सोबतच लगंड्या आणि सल्या ही पात्रे डोळ्यासमोर उभी राहतात. या चित्रपटात लगंड्याची भूमिका साकारणारा अभिनेता तानाजी गळगुंडे प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. मात्र, त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी मिळालेलं मानधन त्याने स्वतःवर खर्च न करता थेट आपल्या मित्राला दिलं, ही गोष्ट अनेकांना माहिती नाही.
तानाजी गळगुंडे सिनेइंडस्ट्रीत येण्यापूर्वी शेतात काम करत असतानाच कॉलेजला जात होता. सैराटमुळे त्याच्या आयुष्यात मोठा बदल झाला. या चित्रपटासाठी त्याला फक्त २५ हजार रुपये मानधन मिळालं होतं. त्यावेळी त्याच्या एका जवळच्या मित्राला पैशांची तातडीची गरज होती, म्हणून तानाजीने तो चेक त्याच्या नावाने देऊन मदत केली. त्याने आजपर्यंत हे पैसे परत मागितलेले नाहीत.
चित्रपटात येण्याआधी तानाजी वाळू उचलण्याचे काम करत असे आणि दिवसाला फक्त ३०० रुपये कमवत असे. सैराटनंतर त्याला काही चित्रपट मिळाले आणि त्यातून आलेल्या पैशांत त्याने पायाच्या समस्येसाठी ८ शस्त्रक्रिया केल्या. त्याचबरोबर गावातील शेतीत सुधारणा केली. तानाजीच्या मते, “आज जरी मला चित्रपटात काम मिळालं नाही, तरी मी गावात शेती करून जगू शकतो.”
तानाजी गळगुंडे यांचे खासगी आयुष्य: तानाजी गळगुंडेने मागील वर्षी आपल्या गर्लफ्रेंड प्रतीक्षा शेट्टीसोबत गुपचूप लग्न केलं. ते ५-६ वर्ष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. सुरुवातीला त्यांच्या नात्याला तानाजीच्या आईचा विरोध होता, मात्र नंतर तिने संमती दिली. नुकतंच या जोडप्याला पहिलं अपत्य झालं असून, तानाजी नव्या भूमिकेत म्हणजेच पितृत्वाचा आनंद घेत आहे.