अमेरिकेतील क्लास अॅक्शन खटल्यामुळे WhatsApp च्या एंड-टू-एंड एन्क्रिप्शनवर गंभीर प्रश्न, भारतीय युजर्ससाठीही मोठा इशारा
WhatsApp ही जगातील सर्वाधिक वापरली जाणारी मेसेजिंग अॅप्सपैकी एक असून, “एंड-टू-एंड एन्क्रिप्शन” ही तिची सर्वात मोठी ओळख मानली जाते. मात्र आता अमेरिकेत दाखल झालेल्या एका क्लास अॅक्शन खटल्यामुळे WhatsApp आणि त्याची मूळ कंपनी मेटा (Meta) यांच्या प्रायव्हसी दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या खटल्यात असा आरोप करण्यात आला आहे की WhatsApp युजर्सचे ‘प्रायव्हेट’ मेसेज केवळ सुरक्षित ठेवत नाही, तर ते स्टोअर, अॅनालिसिस आणि अॅक्सेस देखील करू शकते.
अमेरिकेत दाखल झालेला क्लास अॅक्शन खटला
23 जानेवारी रोजी अमेरिकेतील US District Court, Northern District of California येथे हा खटला दाखल करण्यात आला. विशेष बाब म्हणजे या खटल्यामध्ये भारतातील अलका गौर यांच्यासह विविध देशांतील युजर्स फिर्यादी म्हणून सहभागी आहेत. हा खटला एप्रिल 2016 नंतर WhatsApp वापरणाऱ्या सर्व युजर्सचे प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करतो, मात्र अमेरिका, कॅनडा आणि युरोपमधील काही युजर्सना या वर्गातून वगळण्यात आले आहे.
काय आहेत मुख्य आरोप?
या खटल्यात असा गंभीर दावा करण्यात आला आहे की, मेटाने WhatsApp च्या सिस्टममध्ये एक ‘kleptographic backdoor’ लागू केला आहे. या कथित बॅकडोअरमुळे मेटाच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना युजर्सचे मेसेज पाहण्याची परवानगी मिळते, असा आरोप आहे.
फिर्यादींच्या मते, हा प्रवेश फक्त मेटाडेटा (जसे की कोणाशी, कधी, किती वेळा संवाद झाला) इतकाच मर्यादित नसून, प्रत्यक्ष मेसेज कंटेंटपर्यंत पोहोचू शकतो. हे आरोप कथित व्हिसलब्लोअर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार करण्यात आले आहेत.
एंड-टू-एंड एन्क्रिप्शनवर प्रश्नचिन्ह
WhatsApp ने आतापर्यंत कायम असा दावा केला आहे की, एंड-टू-एंड एन्क्रिप्शनमुळे युजर्स आणि ज्यांच्याशी ते संवाद साधतात, त्यांच्याशिवाय कुणीही मेसेज वाचू शकत नाही. मात्र जर या खटल्यातील आरोप खरे ठरले, तर WhatsApp च्या एन्क्रिप्शन मॉडेलवरच मोठा आघात होऊ शकतो.
मेटाचा जुना प्रायव्हसी ट्रॅक रेकॉर्ड
या खटल्यात मेटाच्या पूर्वीच्या गोपनीयता वादांचाही उल्लेख करण्यात आला आहे.Cambridge Analytica स्कँडल प्रकरणात 2019 साली मेटाला 5 अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला होता.
याशिवाय युरोपमध्ये GDPR उल्लंघनासाठी 1.2 अब्ज डॉलर्सचा दंड मेटावर लावण्यात आला होता.या पार्श्वभूमीवर, सध्याचे आरोप अधिक गंभीर मानले जात आहेत.
WhatsApp कडून आरोप फेटाळले
WhatsApp चे प्रमुख Will Cathcart यांनी हे सर्व आरोप ठामपणे फेटाळले आहेत. त्यांच्या मते, WhatsApp युजर्सचे मेसेज वाचू शकत नाही कारण Encryption Keys युजरच्या फोनमध्ये असतात, कंपनीच्या सर्व्हरवर नाहीत. त्यांनी या खटल्याचे वर्णन “निराधार आणि फक्त मथळे मिळवण्यासाठी केलेला दावा” असे केले आहे.
भारतासाठी हे प्रकरण का महत्त्वाचे आहे?
हे प्रकरण भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. WhatsApp ने भारतातील IT Rules 2021 ला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कंपनीचा दावा असा आहे की, मेसेज ट्रेसिंग करण्यास भाग पाडल्यास एंड-टू-एंड एन्क्रिप्शन मोडेल.मात्र जर अमेरिकेतील न्यायालयात हे सिद्ध झाले की WhatsApp ला आधीपासूनच मेसेज कंटेंटमध्ये प्रवेश आहे, तर भारतातील WhatsApp चा हा युक्तिवाद कमकुवत ठरू शकतो.
DPDP Act अंतर्गत संभाव्य परिणाम
जर मेटाने युजर्सच्या संमतीशिवाय मेसेज कंटेंट हाताळल्याचे आढळून आले, तर भारतातील Digital Personal Data Protection Act, 2023 अंतर्गत कंपनीवर मोठा दंड आकारला जाऊ शकतो. यामुळे भविष्यात टेक कंपन्यांच्या डेटा वापरावर अधिक कडक नियंत्रण येण्याची शक्यता आहे.
WhatsApp च्या प्रायव्हसीवर उभा राहिलेला हा वाद केवळ एका खटल्यापुरता मर्यादित नसून, तो जगभरातील कोट्यवधी युजर्सच्या डिजिटल सुरक्षेशी संबंधित आहे. न्यायालयाचा निकाल काय लागतो, यावर WhatsApp च्या विश्वासार्हतेसह डिजिटल प्रायव्हसीच्या भवितव्यावरही मोठा परिणाम होणार आहे.