ग्राहकांना ‘आता’ कार नको! GST कपातीमुळे लोन रद्द करण्यासाठी बँकांकडे तगादा!

ग्राहकांना ‘आता’ कार नको! GST कपातीमुळे लोन रद्द करण्यासाठी बँकांकडे तगादा

नवी दिल्ली | 16 सप्टेंबर 2025: केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर (GST) दरात मोठा बदल जाहीर केल्यानंतर वाहन बाजारात अनपेक्षित घडामोडी सुरू झाल्या आहेत. २२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या नव्या जीएसटी दरामुळे कारच्या किमती मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहेत. त्यामुळे आधीच कर्ज मंजूर करून कार खरेदीसाठी तयारी केलेले अनेक ग्राहक आता बँकांकडे आपले लोन रद्द करण्यासाठी तगादा लावत आहेत.

काय बदल झाले?

पूर्वी 1200 सीसीपर्यंतच्या कारवर 28% जीएसटी आकारला जात होता. परंतु केंद्र सरकारच्या नव्या घोषणेनुसार हा दर कमी करून 18% करण्यात आला आहे. याचा थेट फायदा ग्राहकांना होणार असून कारच्या किंमती लक्षणीयरीत्या कमी होतील.

ग्राहकांचा कल का बदलला?

किमती कमी होणार असल्याने अनेक ग्राहकांनी आधी घेतलेले कर्ज रद्द करून, २२ सप्टेंबरनंतर कमी किमतीत कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी बँकांच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मंजूर झालेलं लोन रद्द करण्यासाठी लागणारे शुल्क खूपच कमी आहे. काही बँकांनी तर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या हंगामात प्रक्रिया शुल्क माफ करण्याचाही निर्णय घेतला आहे.

ऑटो कंपन्यांचा प्रतिसाद

टाटा, महिंद्रा यांच्यासह बहुतांश मोठ्या वाहन कंपन्यांनी आपल्या कारच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. यामुळे ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढली असून, अनेकजण आता जास्त चांगल्या व्हेरिएंटकडे वळू शकतात.

ग्राहकांनी कोणती काळजी घ्यावी?

जर कार डीलरने आधीच इनव्हॉईस जारी केला असेल, तर जुनाच जीएसटी दर लागू होईल. पण इनव्हॉईस तयार नसेल, तर ग्राहकांना थेट नव्या दरांचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे खरेदी करताना इनव्हॉईसची तारीख तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

फक्त कारच नाही तर इतरही वस्तू स्वस्त

जीएसटी कपातीमुळे केवळ कारच नाही तर जवळपास ४०० उत्पादनं स्वस्त होणार आहेत. त्यात साबण, शॅम्पू, एसी, ट्रॅक्टरसह दैनंदिन जीवनातील अनेक वस्तूंचा समावेश आहे. २२ सप्टेंबरपासून नवे दर लागू झाल्यानंतर ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे वाहन बाजारात खरेदीला नवसंजीवनी मिळणार असून ग्राहकांना थेट फायदा होणार आहे. मात्र इनव्हॉईस आणि लोन रद्द करण्याच्या अटी लक्षात घेऊन पुढील पाऊल उचलणे गरजेचे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top